डोक्यात रुतलं धारदार शस्त्र ; गुंडगिरीचा थराराक अंत

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
इस्लामपूर | शहराच्या मध्यवर्ती भागात शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार रोहित पंडित पवार (वय 23, रा. बेघर वसाहत) याचा भरदिवसा तीन जणांच्या टोळक्याने पाठलाग करत निर्घृण खून केला. धारदार शस्त्राने डोक्यावर व मानेवर वार करत त्याचा अत्यंत अमानुष पद्धतीने खात्मा करण्यात आला. विशेष म्हणजे, हल्ल्यानंतर तिन्ही संशयित थेट पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, रोहित पवार व हल्लेखोरांमध्ये आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद सुरू होता. त्यामुळे रोहित सतत त्यांच्या निशाण्यावर होता. शुक्रवारी (ता. 1 ऑगस्ट) दुपारी कारखाना रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ रोहितच्या उपस्थितीची माहिती मिळताच, संशयितांनी त्याचा पाठलाग सुरू केला. आपल्यावर हल्ला होणार असल्याची चाहूल लागताच रोहितने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी त्याला गाठत डोक्यात आणि मानेवर धारदार हत्याराने वार केले.
हल्ला इतका भीषण होता की, एक धारदार हत्यार थेट रोहितच्या डोक्यातच रुतून राहिले. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला दुचाकीवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर इस्लामपूर पोलिसांत हौसेराव कुमार आंबी (वय 21, रा. हुबालवाडी, ता. वाळवा) व त्याच्यासोबतच्या दोन अल्पवयीनांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार राजेंद्र गुरव (रा. इस्लामपूर) यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिस तपासात आर्थिक वादासोबतच वैयक्तिक खुन्नसही या खुनामागे कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत रोहित पवार याच्यावर गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल असून, तो अनेकांना दमदाटी व त्रास देत असल्याची माहिती आहे. शहरात भरदिवसा झालेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.