अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करून निर्घृण खून ; तरुणास अटक

LiVE NEWS | UPDATE
पुणे | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील या गावात बेपत्ता असलेल्या अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने अंगणवाडी सेविकेचा मृतदेह फरफटत नेऊन नदीच्या पाण्यात फेकून दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुभाष बंडू बर्डे (वय 25, रा. कुक्कडवेढे, ता. राहुरी, हल्ली रा. चिचोंडी पाटील) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अंगणवाडी सेविका गुरुवारी (दि. 24) सकाळी नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सुभाष बर्डे याला त्याच्या मुलीच्या पोषण आहाराचे साहित्य घेण्यासाठी अंगणवाडीत बोलावून घेतले. दुपारच्या वेळी तो गेला असता अंगणवाडीत सेविका एकटीच होती. याचीच संधी साधून त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यास सेविकेने प्रतिकार केला असता झटापटीत बर्डे याने त्यांचे डोके भिंतीवर आपटले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अंगणवाडी सेविका दुपारी उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी नातेवाईक व काही ग्रामस्थ अंगणवाडीत गेले असता अंगणवाडीच्या आत फरशीवर सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. ते पाहून नागरिकांना धक्काचं बसला. त्यानंतर या घटनेची माहिती नगर तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
त्यावेळी पोलिसांन घटनास्थळापासून काही अंतरावर ओढत नेल्याच्या खुणा दिसत होत्या. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे निर्देश दिले. पोलिस निरीक्षक आहेर यांना खबर्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, तसेच तांत्रिक विश्लेषणानुसार हा गुन्हा सुभाष बर्डे याने केल्याची माहिती मिळाली. पथकाने आरोपी बर्डेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याने सेविकेवर अत्याचारदेखील केल्याची कबुली दिली तसेच खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अंगणवाडीशेजारील नदीपात्रात टाकून दिल्याचे बर्डे याने सांगितले. दरम्यान, पोलिसांनी आरोपी सुभाष बर्डे याला अटक केली असून पुढील तापासाठी तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.