महाराष्ट्र

अखेर प्रतीक्षेला पूर्णविराम !… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा ; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल

मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

कार्यकारी संपादक | आरु निकाळजे

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठी घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आज (मंगळवार) पार पडलेल्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत या निवडणुकांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळत अखेर प्रतिक्षा संपली आहे.

मात्र, या पत्रकार परिषदेत राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. फक्त नगरपरिषद आणि नगरपंचायतींसंदर्भातच ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या शहरांतील महापालिका निवडणुकांची प्रतीक्षा अजून वाढली आहे.

२ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल
राज्यातील एकूण २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केली. या माध्यमातून ६ हजार ८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. यामध्ये दहा नवीन नगरपरिषदांचा आणि पंधरा नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे.

महत्त्वाच्या तारखांनुसार, १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. २१ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख, तर २५ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. मतदान २ डिसेंबर रोजी, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल, अशी घोषणा आयोगाने केली आहे.

आम्ही कुणाच्याही दबावाखाली नाही ; निवडणूक आयोगाचा स्पष्टीकरण
विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना निवडणूक आयोगाने ठाम भूमिका मांडली. निवडणूक आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही, असे स्पष्ट करत, आयोगाकडून दुबार आणि तिबार मतदारांच्या यादीबाबत कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.

आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते. ज्या मतदारांची नावे चुकून वगळली गेली आहेत, त्यांचे पुनर्नामांकन करण्यात येत आहे. तसेच प्रभाग किंवा यादीतील त्रुटी दुरुस्त केल्या जात आहेत, असेही निवडणूक आयोगाने नमूद केले.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा हा पहिला टप्पा ठरणार असून, आता सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मतदारसंघांत चर्चांचा पुन्हा उधाण आलं असून, राजकीय वातावरण तापू लागलं आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही