अपघात की कट? ‘ती’ फाईल, १० दिवसांचा कालखंड आणि संसदेत खळबळ ; संजय राऊतांचा भाजपवर थेट हल्लाबोल

LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अपघाती निधनाभोवतीचा धुरळा संसदेत पुन्हा एकदा उठला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या सनसनाटी दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “इतक्या तडफदार, दमदार नेत्याचा असा अकाली मृत्यू हा अपघातच होता का? असा थेट सवाल उपस्थित करत राऊतांनी भाजपला लक्ष्य केलं.
राज्यसभेत बोलताना राऊत म्हणाले, अजित पवार हे आक्रमक आणि निर्भीड नेते होते. गेल्या तीन वर्षांत ते भाजपचे साथीदार होते. पण भाजपनेच सिंचन घोटाळ्यात ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर केले होते. मग ते भाजपसोबत गेले आणि अचानक ‘पवित्र’ झाले हा चमत्कार कसा? अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवलं.
राऊतांनी घटनाक्रम मांडताना १५ जानेवारीचा संदर्भ दिला. “त्या दिवशी अजित पवारांनी भाजपला प्रत्युत्तर देताना गंभीर आरोप केला होता. सिंचन घोटाळ्यात भाजपनेही भरपूर पैसे खाल्ले, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. एवढंच नव्हे तर त्या आरोपांची ‘फाईल’ आपल्याकडे असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं,” असं राऊत म्हणाले. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत अजित पवारांचा रहस्यमय मृत्यू झाला हा योगायोग मानायचा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संसदेत राऊतांनी आणखी धक्कादायक दावा केला. ती फाईल अजित पवार कायम स्वतःजवळ ठेवत. मुंबईहून बारामतीला निघताना देखील ती फाईल त्यांच्या सोबत होती, अशी माझी माहिती आहे. मुंबई सोडल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांचा मृत्यू झाला, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ‘ती’ फाईल नेमकी कुठे आहे, हा प्रश्न देशासमोर उभा राहिला आहे.
“अजित पवारांचा मृत्यू संशयास्पद आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे,” अशी ठाम मागणी राऊतांनी केली. न्यायमूर्ती लोया प्रकरणाची आठवण करून देत, अजित पवारांच्या बाबतीत घातपात तर घडवला गेला नाही ना? असा थेट सवाल त्यांनी सभागृहात केला.