गुन्हे विश्व्महाराष्ट्रविदर्भ

अवघ्या ३ तासांत जबरी चोरीचा पर्दाफाश ; ४ गुन्ह्यांची उकल ; २ आरोपी अटकेत, मोबाईल व रोकड हस्तगत

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

वाशिम जिल्हा पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांच्या चपळाईचा आणि गुन्हे उकलण्याच्या दमदार क्षमतेचा ठसा उमटवला आहे. अवघ्या तीन तासांत चार जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करून दोन सराईत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले. या कारवाईत पाच मोबाईल फोन आणि रोकड असा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

८ ऑगस्टच्या संध्याकाळी सहा ते आठ या दोन तासांच्या कालावधीत वाशिम शहर आणि वाशिम ग्रामीण हद्दीत एकूण चार ठिकाणी टोळीने चाकूचा धाक दाखवत मोबाईल आणि रोकड हिसकावली. फिर्यादींनी दिलेल्या वर्णनावरून तिन्ही आरोपींचा चेहरा व गुन्ह्याची पद्धत एकसारखी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि योगेश धोत्रे, वाशिम ग्रामीणच्या ठाणेदार सपोनि श्रीदेवी पाटील आणि वाशिम शहरचे सपोनि बाळासाहेब नाईक यांच्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीदारांच्या खबरीवरून आरोपींचा मागोवा सुरू केला. तपासाचा धागा अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील सुकळी पैसाळी गावापर्यंत पोहोचला.

गावात एका घरासमोर संशयास्पद यामाहा आर-१५ बाईक उभी दिसताच पोलिसांनी घराला वेढा घातला. त्याच क्षणी एक आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाला. मात्र, इतर दोघांना राजू तुळशीराम कांबळे (रा. पंचशील नगर, वाशिम) आणि प्रसिक युवराज जाधव (रा. सुकळी पैसाळी, जि. अकोला) पोलिसांनी झडप घालून पकडले. चौकशीत त्यांनी सर्व चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

सदर टोळीच्या तावडीतून जप्त केलेला मुद्देमाल पाच मोबाईल फोन आणि रोकड पोलिसांनी हस्तगत केला असून, उर्वरित फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या कारवाईत वाशिम जिल्हा पोलिस दलातील विविध शाखांच्या सुमारे तीसहून अधिक जवानांनी समन्वय साधत भाग घेतला.

सदरची ही धडाकेबाज मोहीम पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सपोनि श्रीदेवी पाटील, सपोनि योगेश धोत्रे, सपोनि बाळासाहेब नाईक, पोउपनि शेखर मास्कर, पोउपनि राहुल गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अमलदार संदिप गायकवाड, निलेश घुगे, प्रविण राउत, अमोल कालमुळदळे, प्रविण सिरसाट, उमाकांत केदारे, ओंकार चव्हाण, प्रशांत वाढणकर, ज्ञानदेव मात्रे, अमोल इरतकर, संदिप दुतोंडे, दिपक घुगे, महोदव भिमटे, उमेश देशमुख, शिवा घुगे, अनिल बोरकर, मोहन गवळी, चंदन राठोड, गोपाल चौधरी, संतोष वाघ, संदिप डाखोरे, संदिप उघडे, शरद कुमरे, भारत योगावाढ यांनी प्रत्यक्ष गुन्हेगार पकडण्यात मोलाची भूमिका बजावली.

पोलिसांच्या या विजेच्या गतीतील कारवाईमुळे शहर आणि ग्रामीण भागात दिलासा पसरला असून, नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. फरार आरोपी लवकरच हाती लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही