अवैध गांजा तस्करांना वाशिम पोलिसांचा दणका ; 90 हजारांच्या मुद्देमालासह आरोपी अटकेत
अनुज तारेच्या टीमचे ‘गांजा ऑपरेशन’ ठरले वज्राघात

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क
“गांजाची चव चाखण्याआधीच खाकीच्या हवाली”
जिल्ह्यातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार कारवाई करत तब्बल सहा किलोहून अधिक गांजासह दोन तस्करांना जेरबंद केलं आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार, काही इसम वाशिम शहरात गांज्याची तस्करी करण्यासाठी येणार असल्याचे समजताच तात्काळ पथक तयार करण्यात आले. दिनांक २१ जुलै २०२५ रोजी, वाशिम शहरात सापळा रचण्यात आला. त्यादरम्यान दोन संशयित इसम आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. झडती घेतली असता, त्यांच्या बॅगेत गांजासदृश पदार्थ आढळून आले.
आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
● शेख शहेजाद शेख मुख्तार (वय २५, रा. सिव्हील लाईन, मालेगाव, वाशिम) – याच्याकडे ३.०२३ किलो गांजा
● मुश्ताक मोहम्मद रफिक (वय ३३, रा. गांधी नगर, मालेगाव, वाशिम) याच्याकडे २.९९५ किलो गांजा अश्या प्रकारे दोघांच्याही बॅगेत मिळून एकूण ६.०१८ किलो असा दोघांजवळ गांज्यासदृष अमली पदार्थ मिळून अंदाजे ९०,००० रुपये किंमतीचा पंचासमक्ष जप्त करण्यात आला. पंचासमक्ष वजन करून गांजासदृश अमली पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतला.
तपासादरम्यान स्पष्ट झाले की, संबंधितांनी गांज्यासदृष अमली पदार्थ स्वतःच्या ताब्यात बेकायदेशीररीत्या बाळगला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात एनडीपीएस अधिनियम १९८५ च्या कलम ८(क), २०(ब) अन्वये गुन्हा नोंदवून वाशिम शहर पोलीस ठाण्यात त्यांना ताब्यात देण्यात आले.
ही धडक कारवाई केवळ झपाट्याने नव्हे, तर अत्यंत योजनाबद्ध रित्या पार पडली. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर अधीक्षक लता फड, सहाय्यक अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर कारवाई पथकात पो.नि. प्रदीप परदेशी, सपोनि. योगेश धोत्रे, तसेच अंमलदार विनोद सुर्वे, गजानन झगरे, सुरज खडके, आशिष बिडवे, ज्ञानदेव म्हात्रे, अमोल इरतकर, गोपाल चौधरी, संतोष वाघ, संदीप दुतोंडे, शुभम चौधरी, वैभव गाडवे यांचा समावेश होता.
वाशिमच्या मातीला ‘हाय’ करू पाहणाऱ्यांना आता खाकीची ‘हाय’ लागणार असून अवैध धंदेवाल्यांची झोप उडवणारी ही कारवाई पोलीस दलाच्या सुसंघटित कामगिरीचं जिवंत उदाहरण बनली आहे.