अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड ; आरोपीसह वाहन व रोख मुद्देमाल जप्त

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क
वाशिम जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा अत्यंत सक्रिय झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात विविध अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने कारंजा ग्रामीण परिसरातील काजळेश्वर शेतशिवारामधील अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे.
दि. १४ जुलै २०२५ रोजी पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली की, कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काजळेश्वर शेतशिवार येथे काही व्यक्ती जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीनंतर तात्काळ कार्यवाही करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकली.
धाड टाकल्यावर सदर ठिकाणी अमरदीप गजानन गावंडे याच्यासह आणखी सहा आरोपी ५२ ताशा पत्त्यावर पैशावर हारजिताचा जुगार खेळताना आढळून आले. सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला –
- रोख रक्कम : ₹६३,४२०/-
- सहा मोबाईल फोन्स
- पाच मोटारसायकली
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ₹ १,८३,९२०/- इतकी आहे. सर्व आरोपी आणि मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, आणि सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, अंमलदार विनोद सुर्वे, सुरज खडके, ज्ञानदेव म्हात्रे, अमोल इरतकर, गोपाल चौधरी तसेच संतोष वाघ यांनी संयुक्तरित्या केली.
सदर कारवाईची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून, जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरु असलेली ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. जुगार, दारू, व इतर समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा कटिबद्ध आहे.
ही धाडसत्र कारवाई भविष्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, नागरिकांनीही अशा प्रकारांच्या विरोधात पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.