आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणा-या नराधमास जन्मठेप
वाशीम पोलिसांच्या शास्त्रशुद्ध तपासामुळे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
महिला सुरक्षेबाबत वाशीम पोलिस दल नेहमीच संवेदनशील भूमिका निभावत असते. पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत गांभीर्याने कारवाई केली जाते. त्याचाच प्रत्यय देणारा एक धक्कादायक पण न्याय देणारा निकाल नुकताच वाशीम न्यायालयाने दिला आहे.
दि. १ जून २०२४ रोजी पंचशीलनगर येथे आठ वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात २७ वर्षीय विजय उर्फ भोलाराम बरखम (रा. पंचशीलनगर, वाशीम) या नराधमास आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
घटनेच्या दिवशी बालिका आईवडिलांसह शेजारच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेली असताना, आरोपीने संधी साधून तिचे अपहरण करून स्वतःच्या घरी नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच वाशीम शहर पोलिसांनी वेगाने कारवाई केली.
पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी शास्त्रशुद्ध तपास करून केवळ ६ दिवसांत तपास पूर्ण केला आणि २८ व्या दिवशी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या प्रकरणात वि. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय-३ वाशीम यांनी दोषारोप सिद्ध झाल्याने कलम ६ पोक्सो कायद्यानुसार आजीवन कारावास व २०,००० रुपये दंड** (दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास), कलम ३६३ भादंवि नुसार ५ वर्षे कारावास व ५,००० रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास) शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षाकडून सहाय्यक अभियोक्ता एम. टी. मिसर यांनी युक्तिवाद केला, तर तपासात एपीआय श्रीदेवी पाटील (सध्या ठाणेदार वाशीम ग्रामीण), पीसी योगेश इंगोले आणि पीसी सतीश बांगर यांनी महत्वाची भूमिका बजावली.
या निकालामुळे जनमानसात न्यायालय व पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून पीडितेला न्याय मिळाल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
महिला आयोगानेही या प्रकरणाची विशेष दखल घेत पोलीस अधीक्षक अनुज तारे आणि तपास अधिकारी श्रीदेवी पाटील यांचे दूरध्वनीद्वारे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.