आदिवासी असल्याने पटोलेंकडून अडीच वर्षे छळ ; आ. हिरामण खोसकरांचा गंभीर आरोप

LiVE NEWS | UPDATE
नाशिक | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
इगतपुरीचे काँग्रेसचे निलंबित आमदार हिरामण खोसकर यांनी आपण आदिवासी आमदार असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला गेल्या अडीच महिन्यांपासून छळ केला, असा गंभीर आरोप केला आहे.
विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात मला उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक होते. परंतु, मला उमेदवारी मिळू नये यासाठी पटोलेंनी प्रयत्न केले, असा आरोप करीत राष्ट्रवादी (अजित पवार गट)कडून आता इगतपुरी मतदारसंघातून मलाच उमेदवारी मिळेल, असा दावाही खोसकर यांनी केला. पटोले यांनी खोसकर यांना निलंबित केल्याची घोषणा केल्यानंतर आमदार खोसकर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पटोले माझ्या निलंबनाबाबत खोटे बोलत आहेत. सुलभा खोडके यांना ज्या दिवशी निलंबित केले, त्याच दिवशी मलाही निलंबित करायला हवे होते. परंतु, तसे झाले नाही असे सांगत माझ्या मतदारसंघात पक्षाचा मेळावा असतानाही मला माहिती देण्यात आली नाही, असा आरोपही खोसकर यांनी केला.
क्रॉस वोटिंग’ झाले तेव्हा माझ्यावर संशय व्यक्त करण्यात आला. परंतु, ते कुणी केले हे पक्षाला माहिती होते, असे सांगत मला काँग्रेसकडूनच उमेदवारी करायची होती. माझ्या उमेदवारीबाबत बाळासाहेब थोरात सकारात्मक होते. इगतपुरी मतदारसंघातील लोकांनी थोरातांची भेटही घेतली. त्यांनी मतदारसंघातील नागरिकांना आश्वस्तही केले होते. एवढेच नव्हे, तर मी पटोलेंची भंडारा गोंदिया येथे जाऊन भेट घेतली. तेव्हा त्यांनी उमेदवारी मिळेल, असे आश्वासन दिले. परंतु, मला माहिती न देताच माझ्या मतदारसंघात मेळावा लावल्याने मी पक्षाशी संपर्क साधला.