विदर्भशैक्षणिक

आधारची जुळवाजुळव, हजेरीत फुगवाफुगव

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

राज्यभरातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची पटपडताळणी केली जाणार आहे. यामुळे बोगस हजेरी आणि बोगसगिरीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. राज्यभर शाळांमध्ये होणाऱ्या या पटपडताळणीमुळे अनेक गैरप्रकार उघडकीस येणार आहेत.

राज्याच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची एकाचवेळी पटपडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून शनिवार (दि. ११) पासून त्याची सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षांच्या दिवशीच ही पटपडताळणी होणार आहे. त्यामुळे ज्या संस्थांनी एजंटांच्या माध्यमातून इतर इंग्रजी व स्वयंअर्थसहाय्य शाळांमधून विद्यार्थ्यांची आधारकार्डे विकत घेऊन हजेरीपट फुगवला आहे, अशा संस्था चालकांचे धाबे दणाणले आहेत. आजही अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येचे आकडे कृत्रिमरीत्या फुगवले गेले असल्याचे दिसून येते. एकाच दिवशी ही पडताळणी झाल्यास अनेक ठिकाणची बोगसगिरी समोर येण्याची शक्यता आहे.

यापूर्वी काही वर्षांपूर्वी राज्यात व्यापक स्वरूपात पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर बोगस विद्यार्थी आढळून आले होते. त्यानंतर मागील वर्षीही अशाच प्रकारे एकाचवेळी पटपडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यंदा राज्यभर ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी इयत्ता पहिली ते आठवी तसेच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. ही पडताळणी परीक्षेच्या दिवशीच व्हावी, यासाठी नववी आणि अकरावीच्या मराठी, गणित व इंग्रजी विषयांच्या परीक्षा याच तारखांना ठेवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले आहेत. तसेच या व्यापक पटपडताळणीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधारकार्डे विकत घेऊन विद्यार्थी संख्या फुगवणाऱ्या संस्था चालकांमध्ये खळबळ उडाली असून, विविध खटाटोप सुरू झाल्याचे चित्र आहे.

एकाचवेळी पटपडताळणीबाबत विरोधी सूर

एकीकडे अशा प्रकारच्या व्यापक पटपडताळणीमुळे शिक्षण क्षेत्रातील बोगसगिरी उघड होण्याची शक्यता असताना, काही शिक्षक संघटनांनी मात्र या उपक्रमाला विरोध दर्शविला आहे. शाळांच्या परीक्षांचे नियोजन बिघडेल आणि निकाल तयार करण्याच्या कामावर परिणाम होईल, अशी कारणे पुढे केली जात आहेत. त्यामुळे या संघटना संस्था चालकांची ढाल बनत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही