मंगरुळपीरच्या वाढणकर परिवाराचा ‘ऑपरेशन सिंदुर’ देखावा ; गणरायाच्या चरणी संकटहरणासाठी साकडे

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर | गणेशोत्सव म्हटला की प्रत्येक भक्त आपल्या गणरायाला भावनेने हृदयात स्थान देतो. कोण संकट दूर करण्याची प्रार्थना करतो, कोण कष्ट संपवण्याची विनवणी करतो तर काही भक्त सामाजिक संदेश देतात. पण यंदा मंगरुळपीर येथील वाढणकर परिवाराने गणेशोत्सवाच्या निमित्ताने देशभक्तीचा संदेश देत ‘ऑपरेशन सिंदुर’चा थरारक व आकर्षक देखावा साकारला आणि परिसरात चर्चेचा विषय ठरले.
रुपेश वाढणकर आणि अर्चना वाढणकर यांनी आपल्या घरातील मंडपात या देखाव्याची उभारणी केली. पहलगाम येथे नुकताच झालेला दहशतवादी हल्ला व त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने राबवलेले ‘ऑपरेशन सिंदुर’ याचा घटनाक्रम त्यांनी देखाव्यातून सादर केला. देशावर ओढवलेल्या संकटसमयी सरकारने दाखवलेले धैर्य, शत्रूला दिलेले चोख प्रत्युत्तर आणि जनतेला दिलेला आत्मविश्वास या सगळ्याचे दर्शन या देखाव्यात होते.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. राष्ट्रीय तपास संस्थेने या प्रकरणात मोठी कारवाई करत श्रीनगरमध्ये ६० हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाला मदत करणाऱ्या ओव्हर ग्राउंड नेटवर्कचा पर्दाफाश केला. त्यानंतर काहींना अटक करण्यात आली. दोन महिन्यांनंतर सरकारने ‘ऑपरेशन सिंदुर’ राबवत शत्रूला थेट धडा शिकवला. हा घटनाक्रम वाढणकर परिवाराने आपल्या गणेशमंडपात जिवंत करून दाखवला.
या देखाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यातून त्यांनी केवळ देशभक्तीचाच संदेश दिला नाही, तर गणरायाच्या चरणी साकडेही घातले. संकट कितीही मोठे असो, त्यातून बाहेर पडण्याची शक्ती गणरायाच देतो, हा ठाम विश्वास यातून प्रकट झाला. ‘प्रत्येक संकटातून उभारी घेण्याचे बळ आम्हाला मिळो, गणराया आमच्या देशाचे आणि जनतेचे रक्षण करो” अशी प्रार्थना वाढणकर परिवाराने गणपतीपुढे केली.
गणेशोत्सवात प्रत्येक भक्त गणरायाला मनोभावे पुजतो. गणपती हा विघ्नहर्ता मानला जातो. कष्ट दूर करून सौभाग्य वाढवतो, संकटांतून मुक्त करतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य गणरायाचे स्मरण करूनच सुरू होते. याच श्रद्धेला अधोरेखित करत वाढणकर परिवाराने ‘ऑपरेशन सिंदुर’च्या देखाव्यातून गणरायाला विनंती केली की देशावरचे संकट नष्ट होवो.
परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे. दहशतवादासारख्या गंभीर विषयावर देखाव्याद्वारे प्रकाश टाकत देशभक्ती आणि श्रद्धा यांचा संगम घडवून आणल्याबद्दल वाढणकर परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.