महाराष्ट्रराजकीय

आरगमध्ये पैशांचा माज विरुद्ध जनतेचा आवाज ; भांडवलदारांना सामान्य लेकीचे थेट आव्हान, काँग्रेसच्या बाजूने कौल स्पष्ट

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | सागर गुरव

मिरज | आरग जिल्हा परिषद गटात यंदाची निवडणूक ही केवळ उमेदवारांची लढत न राहता पैसा विरुद्ध प्रामाणिकपणा, भांडवलशाही विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी निर्णायक ठरताना दिसत आहे. एका बाजूला कोट्यवधींचा माज, सत्ता-संपत्तीचा अहंकार आणि प्रभावशाली यंत्रणा तर दुसऱ्या बाजूला सामान्य कुटुंबातून आलेली लेक, जनतेच्या दुःखाशी जोडलेली नाळ आणि संघर्षाची शिदोरी असा थेट सामना आरगमध्ये रंगला आहे. याच कारणामुळे सामान्य मतदारांनीच पुढे येत काँग्रेसला मतदान करण्याचे उघड आवाहन केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

आरग जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या अधिकृत महिला उमेदवार प्राजक्ता प्रशांत चौगुले, आरग लक्ष्मीवाडी पंचायत समिती गणात आप्पासो उर्फ दीपक कवाळे आणि खटाव पंचायत समिती गणात विनाताई रावसाहेब पाटील हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तिन्ही उमेदवारांची समान ओळख म्हणजे जनतेतूनच उभे राहिलेले नेतृत्व आणि गावागावात लोकांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ. मोठमोठ्या भाषणांपेक्षा घराघरात जाऊन संवाद साधणे, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकणे, महिलांचे प्रश्न समजून घेणे आणि तरुणांच्या अपेक्षांना आवाज देणे यामुळे काँग्रेस उमेदवारांची प्रतिमा ‘आपल्यातीलच एक’ अशी ठसठशीत झाली आहे.

आरग गटात भांडवलदार उमेदवारांनी पैशाच्या बळावर प्रचाराचा गदारोळ उडवला असला, तरी जनतेने त्याला थेट आव्हान दिले आहे. पैसा सगळं ठरवणार नाही, आमचा प्रतिनिधी आमच्यातलाच हवा, अशी भावना मतदारांतून व्यक्त होत आहे. प्रचारात झगमगाट असला तरी विश्वासार्हतेचा अभाव आणि लोकांपासून तुटलेपण यामुळे भांडवलशाहीचा माज उघडा पडत आहे, अशी चर्चा गावागावात ऐकायला मिळत आहे.

विशेष म्हणजे महिलांचा आणि तरुणांचा काँग्रेसच्या प्रचारात उत्स्फूर्त सहभाग वाढताना दिसतो आहे. महिलांनी संघटितपणे घराघरात प्रचाराची धुरा घेतली असून तरुणांनी सोशल मीडियावरही काँग्रेसच्या बाजूने आवाज बुलंद केला आहे. संघर्ष, प्रामाणिकपणा आणि जनतेशी नाळ या मुद्द्यांवर काँग्रेसचा प्रचार ठामपणे उभा आहे. त्यामुळे आरगमधील ही निवडणूक आता राजकीय चौकटीबाहेर जाऊन सामाजिक संघर्षाचे रूप घेत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, आरग जिल्हा परिषद गटात काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस वाढत असून भांडवलदारांविरोधात सामान्य जनतेचा स्पष्ट कौल तयार होत आहे. ही निवडणूक निकालापुरती मर्यादित राहणार नाही; ती जनतेच्या स्वाभिमानाचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा निर्णय ठरेल, असे मत स्थानिक जाणकार व्यक्त करत आहेत.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही