आरगमध्ये विशाल पाटलांची तोफ धडाडली ; रेकॉर्ड ब्रेक गर्दीत ‘दंगल-लाट-लॉटरी’ वर हल्लाबोल ; ठेकेदार उमेदवारीवर थेट सवाल

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
प्रतिनिधी | सागर गुरव
मिरज पूर्व भागातील आरग जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या खासदार विशाल दादा पाटील यांच्या जाहीर सभेने राजकीय वातावरण अक्षरशः तापवून टाकले. गुरुवार, दिनांक ३ रोजी बाजारपेठेतील तुळशी कट्टा येथे पार पडलेल्या या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी लाभली. व्यासपीठासमोरील संपूर्ण परिसर जनसागराने फुलून गेला होता. सभा नव्हे, तर विरोधकांसाठी इशाराच ठरावा असा हा मेळावा होता.

विशाल पाटील यांचे भाषण सुरू होताच टाळ्यांचा कडकडाट, घोषणा आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने परिसर दणाणून गेला. भाषणात त्यांनी कोणतीही मुलाहिजा न ठेवता सत्ताधारी आमदारांवर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विकासाचं राजकारण केल्याचं सांगणारे आमदार मिरज पूर्व भागात खरंच विकास केलाय तर जिल्हा परिषद गटासाठी ठेकेदार उमेदवार का द्यावा लागतो? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
गरिबाच्या, सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला उमेदवारी देण्याची हिंमत का होत नाही? विकास केलाय तर सामान्य माणसाला संधी द्यायला काय हरकत आहे? असे प्रश्न विचारत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कथित विकासाच्या दाव्यांची पोलखोल केली. यावेळी सभास्थळी ‘सामान्यांचा आवाज बुलंद करा’ अशा घोषणा घुमू लागल्या.
भाजपवर टीका करताना विशाल पाटील म्हणाले, देशात सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते. जातीचं राजकारण करून समाजात फूट पाडली जाते, पण आरग आणि मिरज पूर्व भागात हे राजकारण चालणार नाही. इथे जातीपेक्षा विकास महत्त्वाचा आहे आणि तोच आमचा अजेंडा आहे.
मिरजेतील दंगलीचा उल्लेख करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका केली. मिरजेची दंगल आणि मोदी लाट यामुळे काही आमदारांना निवडणुकीची लॉटरी लागली. ही जनतेची नाही, तर परिस्थितीची लॉटरी होती, असा घणाघात त्यांनी केला. पुढे ते म्हणाले, कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेल्या उमेदवाराला जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन ‘या, जिल्हा परिषद लुटूया’ असाच संदेश दिला जातोय, असा जहरी टोला त्यांनी लगावला.
सभेदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. स्थानिक नागरिक, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘विकास हवा, दिखावा नको’, ‘ठेकेदार राजकारण बंद करा’ अशा घोषणा वारंवार ऐकू येत होत्या.