आरगेत जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत अज्ञात समाजकंटकांकडून साहित्याची नासधूस ; खिडक्यांचे लोखंडी बार तोडून वर्ग खोल्यात प्रवेश : शिक्षणप्रेमींकडून नाराजी

आरग : अज्ञात समाजकंटकानी वर्ग खोलीतील लोखंडी कपाट उघडून शैक्षणिक साहित्य अस्तावस्थ फेकले आहे.
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | आरग बाजारपेठेतील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत अज्ञात समाजकंटकाने तोडफोड करीत वर्ग खोल्यातील शैक्षणिक साहित्याची मोठी नासधूस केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान,याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केले आहे.
शाळेतील वर्ग खोल्यांच्या दरवाज्याची कडी तोडून,आणि जुन्या लोखंडी खिडक्याचे बार तोडून वर्ग खोल्यात प्रवेश करीत साहित्यांची नासधूस करण्यात आली आहे.हा प्रकार बुधवारी सकाळी शिक्षकांच्या निदर्शनास आला असून मंगळवारी रात्री समाजकंटकांनी हे कृत्य केले असल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
बुधवारी सकाळी आषाढी एकादशीच्या शासकीय सुट्टी वेळी शाळेत शिक्षक आल्यानंतर सदर तोडफोडीचा प्रकार निदर्शनास आला. समाजकंटकानी एका वर्ग खोलीच्या खिडकी मधील लोखंडी सळ्या बाजूला काढून वर्ग खोलीत प्रवेश करून शैक्षणिक साहित्याची मोठी नासाधुस केली आहे.भिंतीवरील घड्याळाची मोडतोड केली. लोखंडी कपाट उघडून आतील शैक्षणिक साहित्य अस्ताव्यस्त फेकले आहे.
तसेच शाळेतील नूतन इमारतीच्या वरील बाजूस असणाऱ्या वर्ग खोलीच्या कड्या व कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि समोरील वर्ग खोलीची कडी मोडून बॅडमिंटन साहित्याची मोडतोड केली आहे.सदर समाजकंटकाचा कसोशीने शोध घेऊन कठोर कारवाई करवी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, शाळा समितीने शाळेच्या आवारात सुरुवातीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.परंतु,सध्या शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. मुलींच्या प्राथमिक शाळेत झालेल्या नुकसाना बाबत शिक्षकांसह शिक्षणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शैक्षणिक साहित्याची तोडफोड निंदनीय ; दिलीप मगदुम ( मुख्याध्यापक)
अज्ञात समाजकंटकानी शैक्षणिक साहित्याची केलेली तोडफोड अतिशय निंदनीय आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. या घटनेबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला आहे.