महाराष्ट्र

आरग-मिरज रोडचे काम संथ ; आठ दिवसांत पूर्ण न झाल्यास ‘रस्ता रोको’चा इशारा

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | सागर गुरव

मिरज | आरग-मिरज मार्गावरील रस्ते विकास कामकाज संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाची लाट उसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आलेल्या या कामात नियोजनाचा अभाव, निकृष्ट दर्जा आणि प्रशासनाची ढिलाई स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सदर मार्गावर ठिकठिकाणी दगड-गोटे साचलेले असून डांबरीकरण अपूर्ण अवस्थेत आहे. परिणामी वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढल्या असून अपघाताचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडी, धुळीचे ढग आणि असमतल रस्त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनविकार, डोळ्यांची जळजळ आणि आरोग्यविषयक तक्रारी वाढत असल्याची बाब पुढे आली आहे.

व्यापारी, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका सेवा तसेच दैनंदिन प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, सूचना फलक, पाणी फवारणी यांचा अभाव असल्याने कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते दिलीप बोरसे यांनी इशारा देत स्पष्ट केले की, येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने आणि तातडीने पूर्ण झाले नाही, तर तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल. त्याचप्रमाणे बी. आर. पाटील यांनी प्रशासनास कठोर शब्दांत जाब विचारत सांगितले, सार्वजनिक सुरक्षेला बाधा पोहोचत असेल, तर संबंधित विभाग जबाबदार धरला जाईल. आठ दिवसांत काम पूर्ण न झाल्यास ‘रस्ता रोको’ आंदोलन अटळ आहे.

नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी, कामाचा दर्जा तपासावा आणि रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा आरग-मिरज मार्गावर जनआंदोलन उसळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही