विठ्ठल मंदिरात दारू दुकानाच्या परवानगीसाठी ग्रामसभा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मालगाव | खंडेराजुरी( ता.मिरज) येथे ज्या पंढरपूरच्या पांडूरंगाच्या चरणी व्यसनमुक्तीसाठी नतमस्तक होतात, अशा विठ्ठल मदिरात चक्क दारू दुकानाला परवानगी देण्यासाठी ग्रामसभा घेतल्याने ग्रामस्थातून ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली. आर्थिक तडजोडीतून ग्रामसभेच्या माध्यमातून दारू दुकानास परवानगी देण्याचा काहींचा प्रयत्न सभेत वादंग झाल्याने बारगळला.
खंडेराजुरी गावात अनेक वर्षापासून देशी दारू दुकान बंदचा ठराव करून गावातील दुकान बाहेरगावी देण्यात आले होते. गाव दारुमुक्त झाल्यानंतर गावास वनश्री पुरस्कार, ग्राम स्वच्छता पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार व राज्यस्तरीय तंटामुक्त पुरस्कार मिळवला होता. त्यामुळे जिल्हा व राज्य पातळीवर खंडेराजुरी गावाचे नाव उज्वल झाले होते.
वादग्रस्त कारभार झालेल्या तात्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावात काही जणांना बियर बारची परवानगी दिली. त्यामुळे गावात देशी दारू दुकानासह बियरबार परमिट रूमला परवान्यासाठी ग्रापंचायतीकडे अर्ज येऊ लागले.
ग्रामपंचायतीने बिअर बार व परमिट रूम देणे संदर्भातच ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसभेच्या विषय पत्रिकेवर हा प्रमुख विषय घेण्यात आला होता. मात्र, देशी दारूला परवान्याचा विषय पत्रिकेवर न घेतल्याने मागणी करणाऱ्यांनी हा विषय पत्रिकेवर येण्यासाठी कंबर कसली होती. संबंधितांनी बिडिओ सह ग्रामसेवकवर दबाव आणल्याची चर्चा आहे.
ग्रामपंचायतीने शनिवारी सरपंच शुभांगी चव्हाण यांच्या अ्ध्यक्षतेखाली बिअरबार, परमिट रुम परवानगीसाठी विशेष म्हणजे ज्या विठ्ठलाकडे व्यसनमुक्तीसाठी साकडे घातले जाते त्याच विठ्ठल मदिरात दारु दुकान परवानगी देण्यासाठी ग्रामसभा घेतल्याने ग्रामपंचायतीच्या भूमिकेबाबत गावात जोरदार चर्चा आणि नाराजीचा सुर आहे. विशेष म्हणजे सभेत देशी दारु दुकानास परवानगीचा विषय पत्रिकेवर न घेतल्याने सभेत वाद झाला. या वादंगामुळे कोणालाच परवानगी न देता सभा गुंडाळण्यात आली. मात्र, दारु दुकानांना परवान्यासाठी विठ्ठल मदिरात सभा घेतल्याने त्याचे पडसाद ग्रामस्थात उमटले.
या ग्रामसभेत सरपंच शुभांगी चव्हाण, वास्कर शिंदे, पोलीस पाटील तानाजी पाटील, शिवाजीराव रुपनुर, आबासो चव्हाण, उपसरपंच माधवी माने,ग्रामसेवक संभाजीराव माने, प्रदीप पाटील, अण्णासाहेब गायकवाड, संदीप पाटील, पवन कांबळे, नीता कागवाडे, नीलम सुतार,किशोर कांबळे, मारुती चव्हाण सह ग्रामस्थ उपस्थित होते.
मंदिरातच सांगितला दारु व बियरमधील फरक…
इंद्रजीत पाटील यांनी ग्रामसभेत दारू, विस्की, वाईन व बियरमध्ये किती अल्कोहोल असते याचे प्रमाण चक्क विठ्ठल मंदिरातच ग्रामस्थांना सांगितल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांत उमटला तीव्र नाराजीचा सूर…
ग्रामपंचायतीने बियर बार परमिट रुमच्या परवान्यासाठी विठ्ठल मदिरात ग्रामसभा घेतल्याने त्याचे पडसाद ग्रामस्थात उमटले.भाजपा तालुकाध्यक्ष दिनकर भोसले, भास्कर शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
सर्वच दुकानांचे परवाने रद्द करा…
खंडेराजूरी तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकाने विश्वासात न घेता परमिटरुमना परवानगी दिली आहे. या दुकानाचे परवाने रद्द करावेत तसेच गावात नव्याने कोणत्याच परमिटरुम व देशी दारु दुकानांना परवानगी न देण्याची महिलांची मागणी आहे.