देवदर्शनाचा प्रवास झाला अपघाताचा, शिक्षकांवर कारवाईची पालकांची मागणी

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर | धोञा तांडा शाळेतील शिक्षकांनी २६ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना पारवा येथील देवीचे दर्शन घेण्यासाठी नेले असता परतीच्या मार्गावर पिकअप पलटी होऊन चार शिक्षकांसह १४ विद्यार्थी जखमी झाले. अपघात गंभीर ठरला असून, चार विद्यार्थी आणि तीन शिक्षकांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.
घटना अशी की, देवदर्शनासाठी शाळेच्या शिक्षकांनी पालकांची परवानगी न घेता विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पिकअपमध्ये बसवले. परतताना पिकअप पलटी होऊन हा अपघात झाला. स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रेफर केले गेले. आता सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.
पालकांनी ठळकपणे म्हटले आहे की, विनापरवानगी विद्यार्थ्यांना देवदर्शनासाठी नेणे हा गंभीर नियमभंग असून, मुख्याध्यापक व दोषी शिक्षकांवर त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी. तसेच नियमबाह्य वाहतुक करणाऱ्या पिकअपवरही कारवाई करण्यात यावी. पोलिसांनी पिकअपवर कलम २८१, १२५ (a), १२५ (b) आणि १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करून वाहन ताब्यात घेतले आहे.
शिक्षण विभागाने याबाबत सांगितले की, शाळेने कोणतीही परवानगी न घेता विद्यार्थ्यांना देवदर्शनासाठी नेले आणि ही बाब गंभीर आहे. सोमवारी चौकशी अहवाल वरिष्ठांकडे सादर करून दोषी शिक्षकांवर कायदेशीर कारवाईसाठी आदेश काढण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बंडूभाऊ इंगोले, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ यांनी म्हटले, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका पोहचविणाऱ्या शिक्षकांना त्वरित निलंबित केले पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयात धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असूनही मौज-मजा किंवा गैरवर्तनासाठी दर्शनाला नेणारे शिक्षक अनुत्तरीय आहेत. अन्यथा, पालकांना लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठाठावा लागेल. त्यांनी अपघातात जखमी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याची तसेच सर्व दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.