नवचेतना सखी फाउंडेशनचा सन्मान जागर ; खंडेराजुरीत स्त्रीशक्तीचा झगमगता जल्लोष

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | नवचेतना सखी फाउंडेशन, मिरज तालुक्याच्या वतीने सौ. जयश्रीताई तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सन्माननजागर स्त्रीशक्तीचा सन्मान हा भव्य सोहळा खंडेराजुरी येथे उत्साहात पार पडला. हजारोंच्या संख्येने जमलेल्या महिलांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. महिलांच्या आत्मविश्वास, कर्तृत्व आणि सामाजिक सहभागाचा अभिनव गौरव या सोहळ्यात करण्यात आला.
स्पर्धांमध्ये उजवी ठरलेल्या विजेत्यांमध्ये सौ. प्रतिभा संदिप गवळी (गवळीवाडी) प्रथम क्रमांक, सौ. स्वप्नाली मारुती रूपनूर (खंडेराजुरी) द्वितीय क्रमांक, सौ. पूजा शितल चौगुले (खंडेराजुरी) तृतीय क्रमांक या महिलांचा मानपत्र, भेटवस्तू आणि टाळ्यांच्या कडकडाटात सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
सोहळ्यादरम्यान महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत मार्गदर्शनपर व्याख्याने, प्रेरणादायी संवाद, कलात्मक मांडणी आणि सांस्कृतिक सादरीकरणांचा सुंदर मेळ बघायला मिळाला. खंडेराजुरीतील महिलांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला अधिक उत्साह लाभला.
महिलांच्या हक्क, प्रगती आणि नेतृत्ववृद्धीसाठी नवचेतना सखी फाउंडेशन आगामी काळात आणखी उपक्रम राबवणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्त्रियांच्या संघर्ष, कर्तृत्व आणि सामर्थ्याला सलाम करणारा हा सन्माननजागर सोहळा उपस्थितांच्या हृदयात कायमची नोंद करून गेला.