कर्मचाऱ्यावर अन्याय ; गवळी कुटुंबाचे उपोषण ; मानवता अधिकार संघटना आक्रमक

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
प्रतिनिधी | श्रीकांत यमगर
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिद्धेवाडी (सावळज, ता. तासगाव) शाखेतील कर्मचारी ज्ञानेश्वर कुंडलिक गवळी यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाल्याचा आरोप होत असून, त्यांचे कुटुंबीय गेल्या चार दिवसांपासून बँकेच्या दालनासमोर उपोषणावर बसले आहेत.
गवळी यांच्यावर काही खातेदारांच्या तक्रारी दाखल झाल्या, मात्र नंतर संबंधित खातेदारांनी लेखी स्वरूपात, आमची कोणतीही तक्रार नाही असे दिल्याचे समोर आले. पैशांच्या गैरव्यवहाराचे आरोपही खोटे ठरले असून, ती रक्कम इतर व्यक्तीने १७ महिन्यांनी खात्यात जमा केली असल्याचे दस्तऐवजांतून उघड झाले आहे. तरीदेखील चौकशी न करता गवळी यांच्यावर थेट कारवाई करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबाची उपजीविका धोक्यात आली आहे.
या अन्यायाविरोधात आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार व मीडिया संघटना आक्रमक झाली आहे. राज्य प्रभारी मिलिंद विष्णू साबळे यांनी १८ सप्टेंबर रोजी गवळी कुटुंबाच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा जाहीर केला. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आम्ही कायदेशीर लढा देऊ आणि आंदोलन तीव्र करू, असा इशारा त्यांनी दिला.
संघटनेचे उपाध्यक्ष समाधान लोंढे, सुनील साबळे, जिल्हाध्यक्ष रतन तोडकर, संघटक उत्तम पाटणे व प्रभारी समाधान मोहिते यांनीदेखील ठाम पाठिंबा दिला. एखाद्या प्रामाणिक कर्मचाऱ्याला चौकशी न करता रस्त्यावर आणणे हे अन्यायकारक आहे. जिल्हाधिकारी, उपनिबंधक व प्रशासन प्रमुख यांनी हस्तक्षेप करून न्याय द्यावा” अशी मागणी संघटनेने केली आहे.