कागदोपत्री हिरवाई दाट ; प्रत्यक्षात ओसाड माळरानाचा थाट
कुठे आहे बोलवाड ; पर्यटक उद्यान शोधत आहेत ; आता कुणाला सलाम करायचा?

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | सांगली जिल्ह्यातील मिरज शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बोलवाड गावातील २५ एकर क्षेत्रफळावर उभारण्यात आलेले स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान सध्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी उभारण्यात आलेले हे उद्यान आज भग्नावस्थेत असून, हे उद्यान आहे की ओसाड माळरान? असा संतप्त सवाल पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे.
सन २०१५ मध्ये सामाजिक वनीकरण विभागामार्फत शासन निर्णय क्र. अंदाज-२०१५/प्रकरण ३६ फ/मुंबई-३२ अंतर्गत राज्यातील ६८ गावांमध्ये प्रत्येकी दोन जैवविविधता उद्याने उभारण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्याअंतर्गत सांगली जिल्ह्यातील बोलवाड (ता. मिरज) आणि खंबाळे (ता. खानापूर) या गावांची निवड झाली. बोलवाड येथे सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला; त्यापैकी ८० लाख रुपये खर्च झाल्याची अधिकृत नोंद आहे. मात्र, या खर्चाचा प्रत्यक्ष लाभ कुठे दिसतो, हा मुख्य प्रश्न आहे.
उद्यानामध्ये आकर्षक प्रवेशद्वार, निसर्ग पाऊलवाटा, नक्षत्रवन, औषधी वनस्पती उद्यान, स्मृतिवन, बांबूवन, फळबाग, बालउद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, ठिबक सिंचन व्यवस्था, माहिती केंद्र, वनतळे आदी सुविधा उभारण्याचा आराखडा होता. सुमारे ३००० वृक्षांची लागवड केल्याचे कागदोपत्री नमूद आहे. जांभूळ, आवळा, फणस, पळस, निलकरंज, बकुळ, शिसव यांसह विविध दुर्मिळ वनस्पतींचा समावेश असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत या पंचवीस एकर परिसरात झाडांची निगा, पाणीपुरवठा, देखभाल-दुरुस्ती यांचा लवलेशही दिसत नाही.
बालउद्यानातील खेळणी तुटलेली, माहिती फलक गंजलेले, प्रवेशद्वार उध्वस्त आणि परिसरात गवताचा अतिरेक अशी परिस्थिती आहे. २०२० पासून पर्यटकांसाठी खुले करण्याचे आदेश असतानाही प्रत्यक्षात उद्यानाचा वापर होत नाही. २०२३ नंतर सामाजिक वनीकरण विभागाने देखभाल जबाबदारी ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यानंतर ग्रामपंचायतीने कोणती देखभाल केली, पुन्हा निधी मिळाला का, आणि मिळाला असेल तर तो कुठे खर्च झाला याबाबत प्रशासन मौन बाळगून आहे.
वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि हरितक्षेत्रांचा ऱ्हास याला उत्तर म्हणून जैवविविधता उद्यानांची संकल्पना पुढे आली. नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे, दुर्मिळ वनस्पतींचे जतन करणे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र उभारणे हा मूळ उद्देश होता. मात्र, बोलवाडचे वास्तव पाहता हा संपूर्ण प्रकल्प ‘कागदोपत्री हरितक्रांती’ ठरत असल्याची टीका होत आहे.
प्रशासन, सामाजिक वनीकरण विभाग, संबंधित लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत यांनी तात्काळ संयुक्त पाहणी करून खर्चाचा सविस्तर लेखाजोखा सार्वजनिक करावा, दोषींवर जबाबदारी निश्चित करावी आणि उद्यानाचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.