क्राईमगुन्हे विश्व्

कारागृहाच्या तटावरून उडी मारून फरार झालेला ‘खुनाचा न्यायबंदी’ अखेर जेरबंद ; मिरज पोलिसांची धडाकेबाज कारवाई

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

मिरज | सांगली मध्यवर्ती कारागृहातून 13 नोव्हेंबर रोजी तटावरून खंदकात उडी मारून पलायन केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील न्यायबंदी अजय दावीद भोसले (वय 35, रा. संजय गांधी झोपडपट्टी, तासगाव वेस, मिरज) याला मिरज शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाईत जेरबंद केले. कारागृहातून पळ काढल्यानंतर त्याच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 262 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार दिवसांपासून फरार असलेल्या भोसल्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क करण्यात आली होती.

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे व मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आरोपीच्या शोधासाठी सर्व विभागांना विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणीत गिल्डा व पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी मिरज शहर गुन्हेप्रकटीकरण पथकावर शोधमोहीम राबविण्याची जबाबदारी सोपवली. पथक सतत आरोपीचा माग काढत असताना गुप्त माहिती मिळाली की भोसले हा उदगाव बसस्थानक, जयसिंगपूर परिसरात दिसला.

यानुसार गुन्हेप्रकटीकरणाचे सपोनि आण्णासाहेब गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.शि. दिपक परीट यांनी तातडीने ठिकाणी धाव घेतली. काही वेळ निगराणी ठेवल्यानंतर आरोपी भोसले बसस्थानकावर दिसताच परीट यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच भोसले पळण्याच्या तयारीत होता. मात्र, पो.शि. परीट यांनी एकहाती धाडस दाखवत त्याला शिताफीने जेरबंद केले. त्यानंतर त्यांनी जयसिंगपूर पोलीसांकडून तातडीची मदत मागवली. पो.उपनिरीक्षक प्रवीण माने, पो.ह. मांजरे व पो.शि. अवघडे यांच्या मदतीने आरोपीला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. न्यायबंदी भोसल्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाहीसाठी सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले जात आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक घुगे, अपर पोलीस अधीक्षक बारवकर, उपविभागीय अधिकारी गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली. सपोनि गादेकर, सपोफौ कदम, पो.ह. वाघमोडे, मोरे, पो.शि. नायकोडे आणि विशेषतः पो.शि. दिपक परीट यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही