खटावमध्ये दुर्दैवी घटना : विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | खटाव येथील मंगसुळी रोडवरील वडर वस्ती, पाटील मळ्यात राहणारा प्रविण हणमंत पाटील (वय 27) या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली.
प्रविण हा हणमंत पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. सकाळच्या सुमारास पावसात घरासमोरील पाण्याची टाकी भरण्यासाठी तो विहीरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेला. त्यावेळी मोटार पेटीमध्ये विजेचा शॉक बसल्याने प्रविण गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला उपचारासाठी मिरज येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
प्रविणच्या मृत्यूची बातमी गावात क्षणात पसरली. घरासमोर नातेवाईक व तरुणांची मोठी गर्दी जमली होती. अंत्यविधी भावनिक वातावरणात पार पडला. अतिशय शांत, मृदू स्वभावाचा आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारा प्रविण अचानक जग सोडून गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सदर घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.