कृषी अधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप ; शेतकऱ्यांचे तालुका कार्यालयाचे हेलपाटे बंद

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर तालुक्यात कृषी विभागाच्या कामांना गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ग्राम पातळीवर थेट शेतकऱ्यांशी संपर्कात राहून काम करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांना आता विभागाकडून लॅपटॉप देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची बहुतेक ऑनलाइन कामे बांधावर किंवा गावातच पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, तालुका कार्यालयाचे फेरफटके मोठ्या प्रमाणावर कमी होतील.
आतापर्यंत कृषी अधिकाऱ्यांना कागदपत्रे व ऑनलाइन नोंदींसाठी मंडळ किंवा तालुका कार्यालयात जावे लागत होते. यामुळे शेतकऱ्यांनाही अनेकदा वेळ वाया जाऊन त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता अधिकाऱ्यांच्या सोबत लॅपटॉप उपलब्ध झाल्याने ते ज्या गावात किंवा शेतात असतील, तिथूनच शेतकऱ्यांची महाडीबी, विविध शासकीय योजना, पिकविमा, अनुदान नोंदी आदी कामे तत्काळ ऑनलाइन पूर्ण करू शकतील. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही.
या निर्णयामुळे कृषी कामात वेग, अचूकता आणि पारदर्शकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च तिन्ही बाबतीत मोठी बचत होणार आहे. कृषी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून ही मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. शासनाने त्यास मान्यता दिल्याने विभागातील कामकाज अधिक सुलभ व गतिमान होणार आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील ४६ कृषी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जरी ही तरतूद अधिकृत कागदपत्रांमध्ये अद्याप नोंदवली नसली, तरी पुढील महिन्याभरात प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सुविधेमुळे “बांधावरूनच ऑनलाइन कामे” हा नवा अनुभव शेतकऱ्यांना मिळणार असून, ग्रामीण भागातील कृषी प्रशासन अधिक सक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.