केरा विभागात ग्रामदैवतांच्या यात्रांचा हंगाम सुरू ; बोंद्रीच्या जानाईदेवीची २३-२४ रोजी यात्रा

LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | संजय कांबळे
पाटण | केरा विभागात सालाबादप्रमाणे फाल्गुन महिन्यात ग्रामदैवतांच्यात यात्रांचा हंगाम सुरू झाला असून परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवकणे, मणदुरे, बिबी, बोंद्री, केर व पिंपळोशी या गावांतील ग्रामदैवतांच्या यात्रांना आजपासून प्रारंभ होत आहे. श्रद्धास्थानांच्या दर्शनासाठी चाकरमानी तसेच माहेरवाशीनी मोठ्या संख्येने गावी परतल्याने गावागावांत घराघरांत भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.
प्रारंभी बिबी गावचे ग्रामदैवत श्री नवसरी, श्री काळुसरी व श्री भावकाई देवीची यात्रा रविवार दि. २२ व सोमवार दि. २३ रोजी साजरी होत आहे. त्यानंतर सर्वात मोठा मान असलेल्या व बारा थळांची मालकीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोंद्री गावच्या श्री जानाईदेवीची यात्रा सोमवार दि. २३ व मंगळवार दि. २४ रोजी पार पडणार आहे. याच दिवशी पिंपळोशी गावचे श्री पिंपळोबा तसेच मणदुरे गावचे श्री जोतिलिंग यांच्या यात्राही साजऱ्या होत आहेत.
केर गावचे ग्रामदैवत श्री जानाई-मळाईदेवीची यात्रा मंगळवार दि. २४ व बुधवार दि. २५ रोजी होणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध निवकणे येथील श्री जानाईदेवीच्या यात्रेला बुधवार दि. २५ पासून शुभारंभ होत आहे.
यात्रेनिमित्त पालखी सोहळा, जागरण-गोंधळ, ऑर्केस्ट्रा, लोकनाट्य तमाशा, कुस्त्यांचे फड आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण विभागात आनंद व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
पाटण तालुक्यातील निवकणे येथील जागृत ग्रामदैवत श्री जानाईदेवीची पारंपरिक यात्रा दि. २५ पासून सुरू होत आहे. यात्रेदरम्यान जेजुरीहून देवीची पालखी पायी वारी करत निवकणे येथे येते. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात धार्मिक विधी, पालखी सोहळा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. हजारो भाविक या यात्रेस उपस्थित राहतात.