मिरज स्टेशन रोडवर कॅसिनोंचे साम्राज्य ; पोलिसांची डोळेझाक की संगनमत?
तरुणाईला जुगाराच्या अंधारात ढकलणारे ‘लाल पडदे’ कोण उचलणार?

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | मिरज स्टेशन रोड आज जुगार आणि बेकायदेशीर कॅसिनोंचे केंद्रबिंदू बनला आहे. चहाच्या दुकानापेक्षा कॅसिनोंची संख्या अधिक, आणि या लाल पडद्यामागे सुरू असलेला काळाबाजार याकडे पोलिसांचं उघडपणे दुर्लक्ष आहे. नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारी, आंदोलनासारखी अवस्था पण महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही जुगारमक्तेदारी रोखायला प्रशासन मात्र भयंकर उदासीन, की मुद्दाम गप्प?
स्टेशन रोडवर रुलेट, ब्लॅकजॅक, पोकर, स्लॉट मशीन्स, बॅकारॅट, क्रेप्स, ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ अशा अवैध खेळांची खुलेआम रेलचेल सुरू आहे. बाहेर जिल्ह्यांतून आणि कर्नाटकातून येणाऱ्या नागरिकांची लूट तर रोजचेच झाले आहे. इतकेच नव्हे तर दवाखान्यात रुग्णांच्या नातेवाईकांचीही आर्थिक कत्तल चालू आणि या सर्वावर पोलिसांचा ‘आशीर्वाद’ असल्याशिवाय इतका मोठा सिंडिकेट उघडपणे कसे फोफावेल? असा सवाल लोकांच्या मनात पेट घेतो आहे.
बेरोजगार तरुण दिवसाढवळ्या कॅसिनोत बसून आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. घरातील पैसे चोरून, सावकारी कर्ज काढून, उसनवारी करून जुगारात झोकून दिलेली तरुणाई कर्जबाजारी होत आहे. काहीजण नैराश्याच्या खाईत जाऊन आयुष्य संपवण्याचा टोकाचा मार्गही स्वीकारत असल्याचे भयावह चित्र समोर येते. नशेचे पदार्थ, जुगाराचा अतिवापर, आणि त्यात गुरफटलेली तरुण पिढी मिरजची ही शोकांतिका कुणी थांबवणार?
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पोलिसांची कारवाई ‘कागदोपत्री’च. हद्दीतच अवैध जुगार अड्डे उघड्यावर धुमाकूळ घालत असताना पोलीस मात्र गाढ झोपेत, की या साम्राज्याचा ‘हिशोब’ कुठेतरी पद्धतशीरपणे क्लियर होतो?
मिरज स्टेशन रोडवर कॅसिनोंचे वाढते साम्राज्य म्हणजे कायद्याला सरळ आव्हान. आणि हे आव्हान पोलिसांनी स्वीकारायचे की त्याच्याशी ‘समेट’ करायचा याचा निर्णय आता प्रशासनानेच घ्यायचा आहे, अशी संतप्त मागणी नागरिक करत आहेत.