विदर्भ

कोट्यवधी खर्चून वांझोटे खांब; प्रशासन मुकं, नागरिक हैराण

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

वाशिम | मंगरुळपीर शहरातील मुख्य रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बसवलेले अत्याधुनिक पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेले आहेत. फक्त वांझोटे खांब रस्त्याच्या दुतर्फा उभे, पण प्रकाश मात्र गायबचं झाला आहे. परिणामी शहरात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि लोकप्रतिनिधींची गाढ झोप चव्हाट्यावर आली आहे.

रस्त्याच्या दुतर्फा दुभाजकांसह बसवलेले हे पथदिवे सुरुवातीला झगमगाट करत होते. मानोरा रोड ते अकोला मार्गावरील खरेदी-विक्री संघापर्यंत, तर शेलगाव फाटा ते वाढा फाटा या पट्ट्यात लाखो रुपयांचा निधी खर्च करून दिवे बसवले गेले. पण देखभाल आणि दुरुस्तीचा बोजवारा उडाल्याने बहुतेक दिवे आता बंद पडले आहेत. त्यामुळे संध्याकाळ होताच अंधाराचे साम्राज्य पसरते. वाहतूक ठप्प, अपघातांची भीती आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दररोज हजारो नागरिक या रस्त्याने ये-जा करतात. पण रात्रीच्या वेळी भीषण अंधारामुळे लोकांना अक्षरशः धडपडत प्रवास करावा लागतो. महिला आणि विद्यार्थी घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत. अपघातांची शक्यता वाढली असून, कायदा-सुव्यवस्थेवरही याचा परिणाम होतो आहे. तरीही संबंधित विभाग झोपेतच असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

पंचशिलनगर परिसरात तर खांब उभे असले तरी लाईट लागलेले नसतात. “हे खांब खरंच दिव्याचे आहेत की फक्त शोभेचे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी केल्या तरी प्रशासनाच्या कानावर जणू काही ऐकूच जात नाही.

“प्रशासन फक्त टेबलखाली बसून तक्रारींचे कागद झाकते, कृती मात्र शून्य!” असा संतप्त फटकारा नागरिकांनी दिला आहे. लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे पाठ फिरवली असून, अंधारात शहराला सोडून दिले आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही