कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेला अखेर जेरबंद

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
केरळ येथील थ्रिसूरमधून एक कोटी ८० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे सापळा रचून जेरबंद केले आहे. विश्वास रामचंद्र कदम (वय ३४, रा. कौठुळी, ता. आटपाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, संशयित विश्वास कदम याचे केरळमधील थ्रिसूरमध्ये सोन्याचे दागिन्यावर हॉलमार्क करून देण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायात त्याची पत्नी स्नेहल कदम व इतर दोघेजण भागीदार आहेत. थ्रिसूरमधील सराफी व्यवसायिक सदानंदन पोनापन्न यांनी एप्रिल २०२४ मध्ये विश्वास कदम याला एक कोटी ८० लाख रुपये किंमतीचे २२५५.४० ग्रॅम सोन्याचे दागिने हॉलमार्कसाठी दिले होते. पण विश्वास कदम याने हॉलमार्क करून सोने परत न देता पसार झाला होता.
याप्रकरणी थ्रिसूर पोलिस ठाण्यात कदम याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी केरळ पोलिसांचे पथक सांगलीत आले होते. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी संशयिताचा शोध घेण्याची सूचना एलसीबीच्या पथकाला दिली होती. त्यानुसार एलसीबीचे पथक संशयिताचा शोध घेत असताना विश्वास कदम हा भिवघाट येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली देत पावणे दोन कोटीचे सोने थ्रिसूरमध्येच विकल्याची कबुली दिली. त्याला केरळ पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले.