
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
रिसोड तालुक्यातील विदर्भ-मराठवाडा परिसरात विशेष ख्याती असलेल्या श्री संत सखाराम महाराज यांच्या 147 व्या पुण्यतिथीनिमित्त लोणी यात्रोत्सवाचा शुभारंभ 19 व 20 नोव्हेंबर रोजी कार्तिक वद्य अमावास्येपासून होत आहे. हजारो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने कायदा-सुव्यवस्थेची काटेकोर तयारी करण्यात आली आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर 11 नोव्हेंबर रोजी नियोजन सभा पार पडली. या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, महिला- पुरुष भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जावे व गर्दी नियोजन सुरळीत राहावे यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे उपाययोजना आखल्या. यात्रेदरम्यान महिला छेडछाड, चोरी यांसारख्या प्रकारांना आळा बसावा यासाठी मंदिर परिसरासह संपूर्ण यात्रास्थळी पोलीस व पंचायत समितीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यावर सतत पोलीसांची करडी नजर राहणार आहे.
भाविकांनी सोबत असलेली मुले सांभाळावीत, महिलांनी मौल्यवान दागिने व वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, कोणताही संशयास्पद प्रकार दिसल्यास 112 वर संपर्क करावा, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. संस्थानतर्फे नेमलेले स्वयंसेवकही सतत मार्गदर्शनासाठी उपलब्ध राहणार आहेत.
यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी पोलीस स्टेशन रिसोडचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात 7 पोलीस अधिकारी, 43 पोलीस कर्मचारी, 15 महिला पोलीस कर्मचारी तसेच RCP पथकाचा समावेश आहे. शिवाय भाविकांना मदत करण्यासाठी पोलीस मदत केंद्राचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
महसूल विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत, MSEB यांसह सर्व प्रशासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी यात्रेच्या सेवेसाठी हजर राहणार आहेत. कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी फायर ब्रिगेड वाहनदेखील 24 तास सज्ज ठेवण्यात आले असून संपूर्ण प्रशासन यात्राउत्सव सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी तत्पर आहे.