कौटुंबिक वादातून दुहेरी मृत्यूचा धक्कादायक प्रकार; गावात खळबळ

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर | वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी गावात (दि. ८ सप्टेंबर) घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. किरकोळ कौटुंबिक वाद चिघळल्यानंतर पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुहेरी घटनेने गावात शोककळा पसरली असून चहूकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांमध्ये हिंमत महादेव धोंगडे (४१) आणि त्यांची पत्नी कल्पना धोंगडे (३७) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती–पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. शनिवारी सकाळी पुन्हा वाद वाढल्याने संतप्त झालेल्या हिंमत धोंगडे यांनी कुऱ्हाडीने पत्नीवर वार केले. यात कल्पनांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर धोंगडे यांनीही घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
या घटनेची माहिती मिळताच मंगरुळपीर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
एकीकडे दोन जीव एका क्षणात संपल्याने गावात शोककळा पसरली असून नातेवाईक व गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कौटुंबिक वाद इतका चिघळला की, थेट जीवघेणा ठरला, याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. पोलिस मात्र तपासात नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.
