महापालिकेला ‘खुळ्यात काढणाऱ्या’ एन.पी. फिश सेंटरवर कारवाईचा खेळ करणार कधी?

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
वारंवार तक्रारी, निवेदने, पुरावे आणि थेट महापालिकेच्या आयुक्तांच्या दालनापर्यंत पोहोचलेली प्रकरणे पण तरीही एन.पी. फिश सेंटर (विश्रामबाग शाखा, सांगली) वर कारवाईचा घण अजूनही वाजलेला नाही! वार्ड क्रमांक आठमधील लक्ष्मी मंदिराजवळ उभे असलेले हे अनधिकृत बांधकाम सांगली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अगदी माहीत असूनही, राजकीय दबावामुळे कारवाई थांबवली गेली असल्याचा गंभीर आरोप आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मा. मिलिंद विष्णू साबळे सर यांनी केला आहे.
संघटनेच्या तक्रारीनुसार, एन.पी. फिश सेंटरने नकाशा सादर करताना प्रमाणापेक्षा जास्त अनधिकृत बांधकाम केले आहे. हे महापालिकेने स्वतःच्या चौकशीत सिद्धही केले! तरीदेखील नगररचना व अतिक्रमण विभागाने दोन वर्षांपासून कोणतीही कारवाई केली नाही. एवढेच नव्हे, तर या सेंटरने प्रशासनाला खुळ्यात काढण्यासाठी नवीन हॉटेल सुरू करून “नवीन व्यवसाय” म्हणून दाखवण्याचा बनाव केल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.
सांगलीतील “स्वच्छ सांगली” मोहिमेचा गाजावाजा केला जात असताना, या ठिकाणी प्लास्टिकचा वापर खुलेआम सुरू आहे. उपायुक्त स्मृती पाटील आणि स्वच्छता निरीक्षक यांना हे दिसत नाही का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
महापालिकेतील काही अधिकारी भ्रष्टाचारात सामील असल्याचा संशय व्यक्त करत संघटनेने म्हटले आहे की, गरिब विक्रेत्यावर तात्काळ कारवाई केली जाते, पण मोठ्या व्यावसायिकांना हात लावायला देखील प्रशासन घाबरतं.
जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत संघटनेचा लढा सुरूच राहणार असून, न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा दिला आहे.
महापालिकेचा दुहेरी न्याय संपवा तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा. असा गर्जनायुक्त संदेश मिलिंद साबळे यांनी दिला आहे.