खटावमध्ये यात्रेसोबत विकासाचा संकल्प ; बौद्ध समाजासाठी 14 लाखांचा निधी मंजूर ; 50 टी-शर्ट वाटपाचा उपक्रम

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | खटाव येथे आज यल्लमा देवी यात्रेनिमित्त बांधकाम कामगार संघटनेकडून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद यमगर, अण्णासाहेब देशमुख तसेच जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ चंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिरज तालुका प्रमुख परशुराम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली 50 टी-शर्टचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात मुंबई जिल्हा सेक्रेटरी शिवसेना उमेश कारंडे आणि आनंद कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.
या प्रसंगी तालुकाप्रमुख परशुराम बनसोडे यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणून न्याय मिळवून देण्याच्या शिवसेना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारधारेनुसार हा उपक्रम राबवल्याचे सांगितले. समाजातील वंचित घटकांच्या मूलभूत सुविधा आणि विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
बौद्ध समाजाला शंभर वर्षांपासून स्मशानभूमीसाठी शेडची गरज होती. ही ऐतिहासिक मागणी पूर्ण करण्यासाठी 7 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी इनडोअर व्यायाम साहित्याकरिता आणखी 7 लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याचे बनसोडे यांनी सांगितले. या दोन्ही निधींसाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांचे पीए बाळासाहेब यादव यांचे विशेष सहकार्य लाभले.
खटाव येथील बौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात आणखी कामे राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे यात्रेच्या उत्साहात सामाजिक बांधिलकीची जोड मिळाल्याचे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.