खरात प्रकरणाला नवे वळण ; रुपाली चाकणकर अडचणीत येणार?

LiVE NEWS | UPDATE
नाशिकमधील भोंदूगिरी, महिलांचे शोषण आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता तपास अधिकच गतीमान झाला आहे. विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणात नवे धागेदोरे हाती घेत ‘शिवनिका’ संस्थेच्या व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली असून, या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांचे नावही चर्चेत आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष तपास पथक (SIT)ने आता आपला तपास ‘शिवनिका’ संस्थेकडे वळवला आहे. अशोक खरातने स्थापन केलेल्या या संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार आणि विविध कार्यक्रम राबवले गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संस्थेशी संबंधित सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या चौकशीसाठी काही सदस्यांना समन्स बजावण्याची प्रक्रिया सुरू असून, शिवनिकाशी संबंधित असल्यामुळे रुपाली चाकणकर यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. मात्र, त्यांच्या अटकेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, खरात प्रकरणामुळे चाकणकर यांना आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि त्यानंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. खरातसोबत इतर काही राजकीय नेत्यांचे फोटोही व्हायरल झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढली आहे.
विरोधकांकडून या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाईची मागणी होत असून, “खरातला पाठबळ देणाऱ्या राजकीय नेत्यांचीही चौकशी करावी,” असा दबाव वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर SIT आता आर्थिक व्यवहार, निधीचा वापर आणि संभाव्य राजकीय पाठबळ या सर्व अंगांनी तपास करत आहे. येत्या काही दिवसांत शिवनिका संस्थेतील अनेक पदाधिकाऱ्यांची चौकशी आणि शक्य तितकी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच, रुपाली चाकणकर यांना अटक होणार का याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी SITच्या हालचालींमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून राज्याचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.