विठ्ठलवाडी (घोरपडी) गावच्या हद्दीत भीषण अपघात ; बिरोबा दर्शनासाठी निघालेल्या भाविकाचा जागीच मृत्यू, दोघेजण जखमी

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
कवठेमहांकाळ | रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील विठ्ठलवाडी (घोरपडी) गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बिरोबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्तात्रय सरगर (वय ४५, रा. धापाचीवाडी, ता. सांगोला) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अपघातात अन्य दोन भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दत्तात्रय सरगर, विष्णू आनंदा लेंगरे व प्रकाश नामदेव चव्हाण हे तिघेजण (एमएच १२ सीझेड ७२९९ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून) सांगोल्याच्या दिशेने जात होते. त्याआधी त्यांनी आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाचे दर्शन घेतले होते.
दरम्यान, विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीने समोरून जात असलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनास जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, दत्तात्रय सरगर यांना गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा करून आज 26 जून रोजी बातम्या विरोधात सकाळी आठ वाजता अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे