क्राईमगुन्हे विश्व्विदर्भ

खिसेकापूचा खेळ संपला ; वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची अचूक कारवाई

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

वाशिम जिल्ह्यात खिसा कापून चोरी करणाऱ्या अट्टल चोराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. शिरपूर येथील यात्रेत गर्दीचा फायदा घेत ५० हजार रुपये लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले असून त्याच्याकडून चोरीची संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथे जांगीर महाराज यात्रेनिमित्त कुस्तीच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने एका इसमाच्या खिशातून ५०,००० रुपये चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस स्टेशन शिरपूर येथे अपराध क्र. १०२/२६ कलम ३०३(२) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी एक विशेष पथक तयार करून घटनास्थळी रवाना केले. पथकाने परिसरातील तसेच घटनास्थळाजवळील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी अकोला येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपी पुन्हा चोरीच्या उद्देशाने वाशिमकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मालेगाव परिसरात सापळा रचला. अकोला नाका येथे संशयित हालचाली करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अब्दुल आरीफ मोहम्मद रसूल (वय २६, रा. जुने शहर, अकोला, जि. अकोला) असे सांगितले.

पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपीने शिरपूर येथील कुस्ती सामन्याच्या गर्दीत फिर्यादीच्या खिशातून ५० हजार रुपये चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपीस पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन शिरपूरच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

सदर आरोपी अट्टल प्रवृत्तीचा असून त्याने इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दृष्टीने त्याची कसून चौकशी सुरू आहे. यात्रांमध्ये, जत्रांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी खिसेकापूंचा सक्रिय वावर असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अगरवाल, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी (स्थानिक गुन्हे शाखा), सपोनि योगेश धोत्रे व त्यांच्या पथकाने केली. तांत्रिक तपास, गुप्त माहिती व जलद हालचालीमुळे आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही