खोटं दिव्यांग, खोटा मृत्यू ; योजनांवर बोगसांचा राडा सुरूच, रॅकेटचं जाळं उघड

LiVE NEWS | UPDATE
कोल्हापूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | प्रवीण कांबळे
शासनाच्या पैशावर हात मारणाऱ्यांनी बेशरमपणाची सर्व मर्यादा ओलांडलीय. दिव्यांग नसतानाही दिव्यांग असल्याची बनावट कागदपत्रं, जिवंत माणसाला मृत दाखवणारे बनावट मृत्यू दाखले, आणि बांधकाम मजूर नसतानाही ‘कामगार’ असल्याचा ढोंग करून तब्बल ४४ लाख ७७ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे.
या बोगसगिरीचा फडशा उडवला तो सांगलीच्या सहायक कामगार आयुक्त रोहित गोरे यांनीच… गोरे यांच्या चौकशीतून कोल्हापुरातल्या २५ फसवेखोरांची लाजीरवाणी नावं समोर आलीत. यात दोन महिलांचाही समावेश आहे.
कामगार खात्याकडून मिळणाऱ्या अपंग लाभ, मृत्यू लाभ, शिक्षण अनुदान अशा योजनांवर खोटारड्यांनी गिधाडासारखा ताव मारलाय. २० बोगस मजुरांनी खोटं अपंग प्रमाणपत्र देऊन प्रत्येकी २ लाखाचा लाभ घेतला. दोन प्रकरणांत मृत व्यक्तींचं बनावट सर्टिफिकेट देऊन त्यांचं नातेवाईकांनी पैसा उचलला आणि काहींनी तर बांधकाम कामगारच नसतानाही फसवे दाखले देऊन योजनांचा लाभ घेतला.
कोण आहेत हे खोटारडे?
अनिल कळके, चारूदत्त जोशी, दत्तात्रय मोरबाळे, शुभम तुरंबेकर, शीतल नाईक, सुनीता बावडेकर आणि आणखी १९ जणांची नावं शाहूपुरी पोलिसांनी गुन्ह्यात नमूद केली आहेत.
ही लूट योजनेची नव्हे, तर जनतेच्या विश्वासाची आहे. लाडकी बहीण योजना, शिष्यवृत्ती योजना, अपघात मदत अशी कोणती योजना या बनावटगिरीतून वाचलीय? सरकारच्या प्रत्येक योजना ही एजंटांच्या आणि बोगस अर्जदारांच्या रॅकेटसाठी मिळवायची ‘कमाईची दुकानं’ बनली आहेत.
ही केवळ सुरुवात आहे पण आता एजंटांचा खरा चेहरा उघड होणार आहे. या सगळ्या प्रकारामुळे राज्यातल्या इतर जिल्ह्यांतील बोगस प्रकरणांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. काही कामगार संघटनांच्या पाठराखणाखाली ही बनावट शेती फोफावल्याच्या चर्चा सुरू आहेत.