गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा खेळ ; ग्रा..पं पदाधिकारी आक्रमक

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | जिल्हा परिषद प्रशासनाकडून गेल्या सहा महिन्यापासून मिरज पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सुरु असलेला खेळ व प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांनी पाट फिरविल्याने त्याचा पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या कारभारावर परिणाम होत असल्याने मिरजपूर्व भागतील ग्रामपंचायतीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी कायमस्वरुपी गटविकास अधिकाऱ्यांच्या नेमणूकीच्या मागणीसाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मारला.
मिरज पंचायत समितीत गेल्या सहा महिन्यात पाच गटविकास अधिकाऱ्यांच्या नेमणूका झाल्या. सध्या उप मुख्यकार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांच्याकडे प्रभारी कारभार देण्यात आला आहे. ते गेली तीन दिवस रजेवर असल्याने व सतत सह्यांचे नमूने बदलावे लागत असल्याने लाभार्थ्यांना घरकूलांचे हप्ते मिळण्यात येणाऱ्या अडचणी, विविध निधीबाबत पाठपुरावा करण्यात होणारी दिरंगाई, ग्रामपंचायतीच्या अडचणी सोडविण्यात होणारी दिरंगाई यामुळे संतप्त झालेले मिरज पूर्वभागातील मालगाव, सिध्देवाडी, बोलवाड, एरंडोली काकडवाडी, मानमोडी, ढवळी, शिपुर यासह पूर्व भागातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सरपंच वसंतीताई धेंडे, सरपंच स्वागत साळुंखे, उपसरपंच सचिन कांबळे, उपसरपंच तुषार खांडेकर, उपसरपंच स्वप्नील बनसोडे, जावेद मुल्ला, नरेंद्र परदेशी, कपिल कबाडगे, उमेश धेंडे, आप्पा पाटील, दादासो धडस, हारूण शेख, तसेच कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी गटविकास अधिकाऱ्याच्या नेमणुकीसाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मारला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडून बदल्यांच्या सुरु असलेल्या खेळाबाबत प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. पदाधिकारी आक्रमक झाल्याचे समजताच प्रभारी गटविकास अधिकारी सायमोते हे तातडीने दुपारी २.०० वा. पंचायत समितीत दाखल झाले. यावेळी सायमोते व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यात रखडलेल्या कामकाजावरुन शाब्दिक चकमक झाली.
पंचायत समितीला वेळ देवू- सायमोते
आपल्याकडे जिल्हा परिषद, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा तसेच मिरज पंचायत समितीचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यातून आपण वेळ देवून कामकाजात अडचण येणार नाही व रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन प्रभारी गटविकास अधिकारी किरण सायमोते यांनी ग्रामपंचयत पदाधिकाऱ्यांना दिले.