गणेशोत्सवासाठी सजला महाराष्ट्र ; मूर्ती अंतिम टप्प्यात

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
गणेशोत्सव म्हणजे आनंद, भक्ती आणि समाजाला एकत्र बांधणारा सोहळा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात गणरायाच्या आगमनाची आतुरता ओसंडून वाहते आहे. या पावन पर्वाला आता मोजकेच दिवस उरले असताना मंगरुळपीर शहरात गणरायाच्या मूर्तींच्या घडणावळीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
गेल्या वर्षभर अथक परिश्रम घेऊन मूर्तिकारांनी बनवलेली गणपती बाप्पाची मोहक मूर्ती आता अंतिम टप्प्यात सजली आहे. सुप्रसिद्ध मूर्तिकार *सोहम विनोद टेटवार* आणि त्यांचे कुटुंब गेली वीस वर्षे गणरायाच्या मूर्ती घडवत आहे. ४ इंचांपासून तब्बल ८ फूट उंचीपर्यंत विविध मूर्तींची निर्मिती करून त्यांनी भक्तांच्या भावनेला आकार दिला आहे.

ही कला पिढ्यानपिढ्या चालत आलेली असून आजही टेटवार कुटुंब अभिमानाने ही परंपरा जोपासत आहे. वर्षभर केलेल्या परिश्रमाचे खरे पारितोषिक म्हणजे विसर्जनाच्या दिवशी भक्तांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद, असे टेटवार भावनिकपणे सांगतात.
नैसर्गिक रंगांचा दरवळ
या वर्षी खास वैशिष्ट्य म्हणजे मूर्तींना हळद, काजळी आणि नैसर्गिक रंगांनी सजवलेले रूप त्यामुळे मूर्ती अधिक आकर्षक आणि मनमोहक भासतात. बाजारपेठेत यंदा अशा नैसर्गिक मूर्तींना प्रचंड मागणी आहे. त्यातून स्थानिक कारागिरांनाही रोजगाराची गोडी लागली आहे.
मंगरुळपीर आणि आसपासच्या बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष दिसू लागला आहे. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच खरेदीसाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळत आहे. मूर्ती, सजावटीचे साहित्य, गणेशोत्सवाची तयारी यामुळे सणाचे वेध उभारी घेत आहेत.
सणासोबत समाजकार्याचेही आवाहन
गणेशोत्सव म्हणजे केवळ मिरवणुका आणि सजावट नव्हे, तर समाजाला योग्य दिशा देणारा सोहळा आहे. याच पार्श्वभूमीवर प्रियाताई गुल्हाने यांनी केलेले आवाहन विशेष ठरले आहे. गणेशोत्सवाच्या काळात सर्वांनी सेवाभावी उपक्रम हाती घ्या. कायद्याच्या चौकटीत राहून सण साजरा करा. महिलांनीही समाजोपयोगी कार्यक्रम राबवून उत्सव अधिक अर्थपूर्ण करावा, असा त्यांचा ठाम संदेश आहे.
भक्ती आणि संस्कृतीचा संगम
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. एकीकडे मूर्तिकारांचा घाम मूर्तींमध्ये जीव ओततोय, तर दुसरीकडे भाविकांचे मन बाप्पाच्या दर्शनासाठी आसुसलेले आहे. गणेशोत्सव म्हणजे फक्त सण नव्हे, तर समाजाला एकत्र आणणारी ताकद आहे.