गुंडेवाडीत परितक्त्या बहिणीच्या घरकुलावर भावाचा ताबा, महिलेची कारवाईची मागणी ; पोलिसात तक्रार

LiVE NEWS | UPDATE
मिरज | गुंडेवाडी ( ता. मिरज) शिवीगाळ, मारहाण व खूनाची धमकी देत शासनाकडून मिळालेली घरकुल बळकाविणार्या सख्ख्या भावाविरुध्द परितक्त्या बहीणीने मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश देवूनही कारवाई केली जात नसल्याने शालन साबळे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
गुंडेवाडी येथील परितक्त्या महिला शालन साबळे यांना रहाण्यासाठी घर नसल्याने त्यांना ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्याने त्यांनी शासकीय योजनेच्या मिळालेल्या अनुदानातून घरकुल बांधले आहे. शालन साबळे यांच्या नावे जागा व घरकुलाची ग्रामपंचायतीकडे ८ अ ला नोंद आहे. ्त्यांच्याकडून वेळोवेळी घराचा ग्रामपंचायतीस करही भरल्याच्या पावत्या आहेत. घर मालकीचे असताना त्यांचा भाऊ मारुती यशवंत खांडेकर यांनी शालन साबळे यांना शिवीगाळ, मारहाण करीत घराचा बेकायदेशीररित्या ताबा घेतल्याची शालन साबळे यांची तक्रार आहे.
याबाबत त्यांनी सरपंच, पोलिस पाटील, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. दाद न मिळाल्याने त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात दाद मागितली. तेथेही तपास अधिकाऱ्यांकडून कारवाईबाबत चालढकल केल्याचा साबळे यांचा आरोप आहे. भावाकडून शिवीगाळ, मारहाण व खूनाची धमकी देत घर बळकावलेले असताना दोषीवर कारवाईची अपेक्षा होती. मात्र, ग्रामीण पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने शालन साबळे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्याकडे होत असलेल्या अन्यायाबाबत कैफियत मांडली. उपविभागीय पोलिस अधिकारी गिल्डा यांनी या तक्रारीची दखल घेण्याचे ग्रामीण पोलिसांना आदेश दिले आहेत. तरीही संशयीतांवर कारवाई होत नसल्याने ते अद्यापही धमक्या देत असल्याची साबळे यांची तक्रार आहे.
मारहाण, खूनाची धमकी देत घर बळकाविलेल्या मारुती खांडेकर यांच्यावर कारवाई करुन माझ्या मालकीच्या घराचा येत्या आठ दिवसात ताबा न मिळाल्यास आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा परितक्त्या महिला शालन उत्तम साबळे यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना रितसर निवेदन देवून उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.