महाराष्ट्र

मुंबईत भीषण अपघात : रॅपिडो मोटारसायकलला काँक्रीट मिक्सरची धडक ; महिला प्रवाशाचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

मुंबई, (२९ नोव्हेंबर) पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड परिसरात घडलेल्या भीषण अपघातात रॅपिडो (उबर) मोटारसायकलवरील ४९ वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. शुभांगी सुरेंद्र मगरे असे मृत महिलेचे नाव आहे. नवघर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी चालकाची ओळख जवाहिर बशराज यादव (४०), रा. मोहगाव, नवी मुंबई अशी झाली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच अपघात

एफआयआरनुसार, कांजूरमार्ग वाहतूक विभागातील महिला पोलीस हवालदार पूनम सातपुते या सकाळी ११ च्या सुमारास ऐरोली चौकाजवळ त्यांच्या पथकासह वाहतूक नियमनाची जबाबदारी पार पाडत होत्या. त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल अनिल कोकाटे व वाहतूक वार्डन मनीषा घोटिलकर उपस्थित होत्या.

यावेळी सी-लिंक रोड–मुलुंड गोरेगाव लिंक रोड जंक्शनकडे वेगाने धावणारा अशोक लेलँडचा काँक्रीट मिक्सर ट्रक (MH. 43 BG. 6282) तेथे आला.

बेजबाबदार वाहनचालकामुळे भीषण अपघात

पोलीसांच्या माहितीनुसार ट्रकचालकाने अत्यंत निष्काळजी, बेफिकीर आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवत रॅपिडो मोटारसायकल (MH.03 EM.4233) ला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, चालक गणेश विश्राम माधव (२५) आणि मागील सीटवर बसलेल्या शुभांगी मगरे या दोघांना रस्त्यावर दूर फेकले गेले.

जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले

प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ नवघर पोलिसांना माहिती देत जखमींना तातडीने फोर्टिस रुग्णालय (मुलुंड-पश्चिम) येथे दाखल केले. उपचारादरम्यान शुभांगी मगरे यांचा मृत्यू झाला, तर रॅपिडो चालक गणेश माधव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक तपासात आरोपी चालकाचा उलगडा

तपासादरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकाची ओळख जवाहिर बशराज यादव म्हणून पटवली. शुबांगी मोगरे यांनी सुनरुप अपार्टमेंट येथून रॅपिडो बुक केले होते आणि कामानिमित्त माटुंग्याकडे जात असताना हा अपघात झाला.

गुन्हा नोंद; तपास सुरू

घटनेप्रकरणी पोलिसांनी मोटार वाहन अधिनियम व भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही