हरिपूर रोडवर दोन गटात तुफान राडा ; चौघे जखमी

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
कोल्हापूर रोडवरील आदिनाथ मंगलकार्यालयाच्या मागे हरिपूर रोडवर असलेल्या हायप्रोफाईल के-लॉन्ज या हॉटेल मध्ये दोन गटात चाकू, फायटरसह घातक हत्यारांनी तुफान राडा झाला. या राड्यात चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद प्रकाश खाडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून राडा करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र रमेश उदाळे (वय ४२ रा. सांगलीवाडी), पिंटू उर्फ बाळकृष्ण महादेव माळी (वय ३८ रा. माधवनगर), संतोष काशिनाथ पोकळे (वय ३२), अथर्व संजय सरवदे (वय), प्रशांत शेडबाळे, श्रेयश हाडेकर, अनिकेत पवार आणि गणेश पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली-कोल्हापूर रोडवरील आदिनाथ मंगलकार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या हरिपूर रोडवर के-लॉन्ज नावाचे हायप्रोफाईल हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये संशयित आठ जण आणि जखमी चौघेजण पार्टी करण्यासाठी गेले होते. यावेळी रविवारी रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणातून वाद सुरु झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी संशयित आठ जणांनी त्यांच्या जवळ असलेल्या चाकू, फायटर आणि इतर हत्यारांनी हल्ला केला. या हल्ल्यात रवींद्र उदाळे, पिंटू माळी, संतोष पोकळे आणि अथर्व सरवदे हे चौघेजण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी आणि संशयित यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
या प्रकरणी उपनिरीक्षक खाडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या आचारसंहिता सुरु आहे. शहरातील अनेक हॉटेल, रेस्टोरंट पोलीस दहाच्या सुमारास बंद करण्यास सांगत आहेत. प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांवर वेळ झाला तर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, कोल्हापूर रोडवर असणारे हे हॉटेल रात्री उशिरा पर्यंत कोणाच्या आशीर्वादाने सुरु असते याची चर्चा आता रंगली आहे.