“मृत सेविकेच्या नावे निधीचा अपहार ; “ग्रा.पं.चा तमाशा की ग्रामसेवकाचा भोंगळ कारभार
"ग्रामसभेचा ढोंगी नाट्यप्रयोग ; ग्रामसेवकाची 'सुपारी सभा' ; "घोटाळा की काळी जादू?"

LiVE NEWS | UPDATE
लातूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी) | लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी घुगी ग्रामपंचायतीचा चमत्कार पाहून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. चार वर्षांपूर्वी मयत झालेल्या अंगणवाडी सेविका निर्मला अरविंद वाडेकर यांना जिवंत दाखवून ग्रामसभेत उपस्थित असल्याचे दाखवले गेले आहे. हाच एक नव्हे तर अनेक प्रकारच्या बनावट आणि फसव्या कारवाया ग्रामपंचायतीतून उघड झाल्या आहेत.
ग्रामसभा झालीच नाही तरीही दाखवली गेली…
दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी कोणतीही ग्रामसभा प्रत्यक्षात पार न पडता, कागदोपत्री ग्रामसभा दाखवून बनावट इतिवृत्त शासनास सादर करण्यात आले. ग्रामसेवक शिवराज माधव एकोर्गे यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या सही व उपस्थिती न घेता मासिक सभा झाली असल्याचे दाखवले. रजिस्टरवर स्वाक्षऱ्या घेतल्या पण अधिकृत प्रोसिडिंग बुकवर सही घेतलीच नाही, अशी ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा आहे.
माजी सरपंचाने घेतली सभा विद्यमान सरपंच असताना ….
सरपंच पदावर श्रीकला रमेश शेंदकर विद्यमान सरपंच असतानाही, ग्रामसभेचे अध्यक्षपद माजी सरपंच बालाजी निवृत्ती कांबळे यांनी भूषवले. कोणत्या नियमांनुसार हे शक्य आहे, असा थेट सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
मयत सेविकेच्या नावावर हजेरी ; निधीचा सरळ अपहार?
गावातीलच मयत अंगणवाडी सेविका निर्मला अरविंद वाडेकर (मृत्यूला 4-5 वर्षे झाली) यांच्या नावावर उपस्थिती दाखवून, विकासकामांची खोटी नोंद करून निधी परस्पर उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे संपूर्ण प्रकार शासनाची फसवणूक आणि जनतेच्या पैशाचा अपहार असून, यामागे ग्रामसेवक आणि इतरांची संगनमताने रचना असल्याची चर्चा नागरिकांतून केली जात आहे.
गावकऱ्यांची मागणी फौजदारी गुन्हे दाखल करा….
गावकऱ्यांकडून जोरदार मागणी केली जात आहे की, 2022 पासून आजपर्यंत झालेल्या सर्व बनावट ग्रामसभा, मासिक सभा आणि फसव्या इतिवृत्तांची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक, पदाधिकारी आणि सहभागी व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. अशी तक्रार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांना अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी व माजी सरपंच व्यंकटराव बिराजदार यांनी दिली.