२.४३ कोटींची औषधचोरी ; ‘महामार्ग माफिया’ ला वाशिम पोलिसांचा चपराक

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
देशभरातील महामार्गांवर ट्रक लुटणाऱ्या आणि शेकडो कोटींचा माल लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा वाशिम पोलिसांनी थरारक सापळा रचत पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या अतुलनीय तपास कौशल्यामुळे या टोळीच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून, सहा आरोपींचा गंडा उडवत तब्बल ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईनंतर वाशिम पोलिसांचे राज्यभर कौतुक होत आहे.

औषधांच्या बॉक्सवर डल्ला ; २.४३ कोटींची चोरी
२३ जुलै रोजी भिवंडीतील अँबोट कंपनीच्या गोदामातून नागपूर–रायपूर–कटक–कोलकत्ता डिलिव्हरीसाठी औषधाने भरलेला कंटेनर (क्र. MH04JK7054) रवाना झाला. मात्र, मुंबईपासून समृद्धी महामार्गावर जात असताना टोळीतील चोरट्यांनी चालत्या ट्रकचे तीन लॉक कापून तब्बल ४६ बॉक्स, किंमत तब्बल २,४३,८६,६८४ रुपये असा औषधीचा माल लंपास केला. कंपनीने तक्रार दाखल करताच वाशिम पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व सायबर शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले.

८५ हजार वाहनांतून दोन ट्रक संशयास्पद
समृद्धी महामार्गावरील त्या दिवशी प्रवास केलेल्या तब्बल ८५ हजार गाड्यांचा डेटा तपासल्यानंतर पथकाने दोन संशयास्पद ट्रक हेरले. त्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी मुंबई, भिवंडी, संभाजीनगर, मेहकर, मलकापूर ते नागपूर परिसरात शोधमोहीम राबवली. तपास मध्य प्रदेशकडे वळला आणि संशयित ट्रकावर गुप्त पाळत ठेवण्यात आली. दरम्यान, गणेशोत्सव पेट्रोलिंगदरम्यान पथकाला माहिती मिळाली की, टोळीतील गुन्हेगार पुन्हा डाव आखत आहेत. तातडीने तीन पथकांची नेमणूक करून कारंजा परिसरात थरारक सापळा रचण्यात आला.
महामार्गावर थरार ; आरोपी पकडले
ट्रक (क्र. MP09HH9829) कारंज्याकडे येताच पोलिसांनी हॉलिवूड थ्रिलरला साजेशी कारवाई करत ट्रक थांबवून चार आरोपींना जेरबंद केले. झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक कटर व लॉक तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळाले. पुढील चौकशीत मुख्य सूत्रधार राजेंद्र सादुलसिंग चौहान व त्याचा साथीदार भारत घुडावद यांना देवास (म. प्र.) येथून अटक करून त्यांच्याकडील स्कार्पिओ गाडी (क्र. MP09BC3739) जप्त करण्यात आली.
आंतरराजिय टोळीचा मोठा उलगडा
चौकशीत आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरातमध्ये अशा पद्धतीने अनेक महामार्ग चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३८ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून चोरी गेलेल्या २.४३ कोटींच्या औषधांचा शोध घेण्यासाठी पथके मध्य प्रदेशसह विविध राज्यांत रवाना झाली आहेत.
सहा आरोपी कस्टडीत ; पुढील तपास सुरू
आतापर्यंत एकूण सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी रिमांड मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा ग्रामीणचे सपोनी संतोष इंगळे करत आहेत.
पोलिसांची शिताफी ; नागरिकांकडून कौतुक
या थरारक कारवाईत पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व जवानांनी अथक परिश्रम घेतले.