गुन्हे विश्व्महाराष्ट्रविदर्भ

चालत्या बसमधील दागिने चोरी प्रकरणाचा पर्दाफाश ; महिला टोळी जेरबंद, मुद्देमाल जप्त

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
चालत्या बसमधून दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश करत वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने तिघींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

दि. 13 मार्च 2026 रोजी फिर्यादी निर्मला दिलीप श्रीनाथ (रा. रिसोड) या रिसोडहून उमरखेडकडे जात असताना अनसिंगजवळ चालत्या बसमध्ये त्यांच्या पर्सची चोरी झाली होती. या पर्समध्ये सोन्याची पोथ व रोख रक्कम होती. याप्रकरणी अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 82/2026, कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना बसमधील चोरीत महिलांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, दि. 20 मार्च रोजी वाशिम बसस्थानक परिसरात काही महिला संशयास्पद हालचाली करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी पथक तयार करून सापळा रचला.

पोलिसांनी बसस्थानक परिसरातून संशयित महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी संबंधित चोरीची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये लक्ष्मी व्यंकटेश गड्डी (वय 35), कविता अशोक गड्डी (वय 30) व गंगम्मा उलगया गड्डी (वय 50, सर्व रा. चिखलठाणा, जि. संभाजीनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास अनसिंग पोलीस करत आहेत. या टोळीमार्फत आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, रिसोड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 118/2026 च्या तपासात संतोष सुदाम पवार (रा. रिसोड) याला अटक करून त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक शेखर मास्कर व त्यांच्या पथकाने केली.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही