“चिरागने पेटवली फसवणुकीची वात ; उद्योजिकेच्या खिशाला लागली १९ लाखांची आग”

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
कुपवाड प्रतिनिधी | उद्योगजगतात प्रामाणिकपणाला फाटा देत विश्वासघाताची पुन्हा एक घटना समोर आली आहे. संजय इंडस्ट्रियल इस्टेट, माधवनगर येथील जीन कापड निर्मिती करणाऱ्या ‘इंडोटेक्स एक्सपोर्ट’ या कंपनीची संचालिका उद्योजिका ममता बाफना यांची तब्बल १९ लाख ६४ हजार ४०१ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी उल्हासनगरमधील व्यापारी सागर नारायणदास केसवाणी (वय ३५) याच्याविरुद्ध कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धक्कादायक प्रकरणात बाफना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २७ जानेवारी ते ११ एप्रिल २०२३ या कालावधीत उल्हासनगरस्थित ‘चिराग ॲप्रेल्स’ या सागर केसवाणीच्या कंपनीने ममता बाफना यांच्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात जीन कापडाची ऑर्डर दिली होती. करारानुसार मालही वेळेत पोहोचवण्यात आला. मात्र पैसे देताना मात्र केसवाणी याने खेळ सुरु केला!
एकूण २७ लाख २९ हजार ८६२ रुपये किमतीच्या मालाबाबत, संशयिताने केवळ ७ लाख ६५ हजार ४६१ रुपये अदा केले. उर्वरित १९ लाखांहून अधिक रक्कम देण्यासाठी सुरू झाली बहाण्यांची मालिका. फोनवर टाळाटाळ, उडवाउडवी आणि वेळकाढूपणा सुरु झाला. काही महिन्यांनंतरही रक्कम न मिळाल्याने अखेर बाफना यांना धक्का बसला आणि आपल्या विश्वासाचा आणि व्यवहाराचा गैरफायदा घेत फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या घटनेनंतर ममता बाफना यांनी थेट कुपवाड पोलीस ठाणे गाठून तडाखेबाज तक्रार दाखल केली. व्यवसायाच्या मैदानात फसवणुकीचा डाव टाकणाऱ्यांचा चेहरा उघडा पडावा, अशी मागणी बाफना यांनी पोलिसांसमोर केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने हालचाल करून सागर केसवाणी याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
कुपवाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, संशयिताच्या आर्थिक व्यवहारांची झडती घेण्यात येत आहे. यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास केला जात आहे.
या घटनेमुळे उद्योजक व व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. व्यवसायात विश्वासपेक्षा व्यवहार महत्त्वाचा हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, फसवणुकीच्या या धक्कादायक प्रकरणाने औद्योगिक क्षेत्रात चिंता पसरली आहे.
जीन कापड नेलं, पैसा नाही दिला, केसवाणीच्या ‘चिराग’ने विश्वासच पेटवला
सध्या कुपवाड पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्यापारी व उद्योजकांनी अशा आर्थिक व्यवहारात अधिक काळजी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.