जत तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात ; मुख्यमंत्रींकडे आर्थिक मदतीसाठी विनंती

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
राज्यातील अतिवृष्टीने अनेक भागांमध्ये हाहाकार माजवला आहे. यात जत तालुक्यालाही अपवाद नाही. गेल्या दहा दिवसांपासून सलग पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक गावांमध्ये शासनाच्या निकषांनुसार नुकसान नोंदले जात नसले तरी प्रत्यक्षात पिके, फळबागा आणि उपजीविकेची साधने पूर्णपणे नष्ट झाली आहेत.
वळसंग, मुचंडी, माडग्याळ या मंडळांमध्ये ६५ मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून, इतर मंडळांमध्ये कमी प्रमाणात पावसाची नोंद असली तरी पाणी साचल्याने मुळे कुजल्या आणि शेतकरी हवालदिल झाले आहेत. उमदी महसुल मंडळात १८ सप्टेंबर रोजी ३५ मिमी पाऊस नोंदला गेला; मात्र, शेजारच्या मंगळवेढा तालुक्यातील ५० ते ७७ मिमी पावसामुळे नैसर्गिक उताराने पाणी जत तालुक्यात आले आणि उमदी परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्याचप्रमाणे शेगाव मंडळातील खैराव गावातही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती तालुक्यातील अनेक गावांमध्ये आहे आणि शासनाच्या निकषांमुळे वास्तविक संकटाची जाणीव होत नाही. शेतकऱ्यांचे घामाने उभे केलेले पिके वाहून गेल्याने ते उपासमारीच्या उंबरठ्यावर आले आहेत.
यामुळे मी मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे विनंती केली आहे की, ज्या महसुल मंडळांमध्ये पावसाचे नोंदणी निकष पूर्ण होत नाहीत, अशा गावांमध्ये विशेष पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर करावी. हा निर्णय शेतकऱ्यांच्या जीवनाला दिलासा देणारा ठरेल. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शासनाने तत्काळ पुढाकार घ्यावा, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.