जनतेच्या मागण्यांनाच पोलिसांचा नकार ; संतप्त समिती रस्त्यावर उतरणार

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
कवठेमहांकाळ | तालुक्यात दारू, जुगार, मटका यांसारखे अवैध धंदे उघडपणे फोफावत असून, पोलीस प्रशासन मात्र, डोळे झाकून मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या बिनधास्त धंद्यांमुळे तालुक्यातील सामाजिक वातावरण बिघडत असून, महिलांवर छेडछाड, अन्याय व मारहाणीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
या पार्श्वभूमीवर महिला शोषित समाज संघर्ष समिती (MS4) तर्फे तहसीलदार कवठेमहांकाळ यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देणाऱ्यांमध्ये संजना आठवले, इरळीच्या सरपंच सविता माने, राकेश शिंदे, रेश्मा वानखडे, शबाना पटेल, प्राची लांडगे, उज्वला धोत्रे व छाया कांबळे आदींचा समावेश होता.
समितीच्या म्हणण्यानुसार, गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाचे उघड पाठबळ मिळत असल्याने “चोर सोडून संन्याशाला फाशी” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निरपराध नागरिकांना गुन्ह्यांमध्ये ओढले जाते, तर खरे गुन्हेगार मात्र मोकाट फिरत आहेत.
निवेदनात अवैध धंद्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक स्थापन करावे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस गस्त वाढवावी, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, समितीने ही निवेदनाची प्रत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातही द्यायचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी ते स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. समितीने या कृतीला “गैरसंविधानिक” ठरवत तीव्र निषेध नोंदविला.
“प्रशासनाने तातडीने उपाययोजना केली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू,” असा इशारा महिला शोषित समाज संघर्ष समितीने दिला आहे.