जाब विचारल्याच्या रागातून पत्नीसह सासरच्या मंडळीने मारहाण करत चाकूने वार

५० फुटी रस्त्याजवळ राहणाऱ्या एका तरुणास पत्नीला कोठे गेली होतीस असा जाब विचारल्याच्या रागातून पत्नीसह सासरच्या मंडळींनी काठीने मारहाण करत चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. सदर मारहाणीची घटना हि रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जखमी जावीद रफिक जामकर (वय २८ रा. चांदणी मोहोल्ला, सांगली) याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पत्नी मिनाज जामकर (वय २३), सासरे राजू शेख (वय ४५), मेव्हणा शोहेब राजू शेख (वय २५) आणि फिरोज हवालदार (सर्व रा. सांगली) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी जावीद जामकर हा सेंट्रिंगचे काम करत असून पत्नीसोबत शहरातील ५० फुटी रोडवर असलेल्या चांदणी मोहोल्ला परिसरात राहतो. रविवारी जावेद हा सायंकाळी कामावरून घरी आला. यावेळी पत्नी घरामध्ये नव्हती. काही वेळाने पत्नी संशयित मिनाज या घरी आल्यानंतर त्यांना तू कोठे गेली होतीस असा जाब विचारला. यावेळी पत्नी मिनाज यांनी भांडण करून काही अंतरावर असलेल्या माहेरी निघून गेल्या. यावेळी जावीद हे त्यांना आणण्यासाठी गेले असता संशयित चौघांनी भांडण करून शोहेब शेख याने त्याच्या जवळ असणाऱ्या चाकूने हातावर वार केला. सासरे राजू शेख यांनी काठीने मारहाण केली. पत्नी मिनाज आणि मेव्हणा फिरोज हवालदार यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जखमी केले. घडलेल्या या घटनेनंतर जावीद जामकर याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.