जि. प. प्राथमिक शाळा बेल्हे नं.१ मध्ये ‘आनंददायी रविवार’ अंतर्गत आनंदी आठवडा बाजार उत्साहात

LiVE NEWS | UPDATE
पुणे | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे क्रमांक १ येथे आनंददायी रविवार उपक्रमांतर्गत आज आनंदी आठवडा बाजाराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील बेल्हे हे गाव आठवडा बाजारासाठी प्रसिद्ध असल्याने येथील विद्यार्थ्यांना बाजारातील व्यवहारांचे उत्तम ज्ञान आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने शाळेमध्ये आनंदी आठवडा बाजार भरवण्यात आला. ग्रामपंचायत सदस्या पल्लवी ताई भंडारी व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ यांच्या शुभहस्ते या शालेय बाजाराचे उद्घाटन झाले.
या बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी मेथी, पालक, भोपळा, मिरची, वांगी, भेंडी यांसह विविध प्रकारचा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. त्याचबरोबर फळे, खाऊ गल्ली, कडधान्ये, किरकोळ वस्तू तसेच मनोरंजनात्मक खेळांचेही स्टॉल लावण्यात आले होते.
या प्रसंगी उपसरपंच राजेंद्र पिंगट, सावकार पिंगट, कैलास औटी, स्वप्नील भंडारी, गणेश चोरे, मनुआप्पा भोरे, माजी अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले, स्वप्निल शिंदे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ईश्वर पिंगट, प्रशांत औटी, विलास पिंगट, स्वाती कोकणे, गोरक्ष शिरतर, पायल सोनवणे, नसरीन पठाण, सुवर्णा कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आनंदी बाजारात खरेदी करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
पालकांनी या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद देत बाजारात सहभाग घेतला. सर्वांच्या सहकार्यामुळे बाजारात तब्बल २५ हजार रुपयांची उलाढाल झाली. नेहमी आई-वडिलांसोबत बाजारात जाणारी बालचमु आज स्वतः वस्तूंची देवाण-घेवाण करत, पैशांचा अचूक हिशोब ठेवताना पाहून मान्यवर व पालकांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
या उपक्रमाचे नियोजन उपशिक्षिका मीरा बेलकर, हरिदास घोडे, अशोक बांगर, रोहिदास साळवे, संतोष डुकरे, नूरजहाँ पटेल, प्रविणा नाईकवाडी, सुषमा गाडेकर व अंजना चौरे यांनी केले. तसेच केंद्रप्रमुख वनिता हांडे, विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे आणि गटशिक्षण अधिकारी अशोक लांडे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.