निवडणूक रणघुमाळमहाराष्ट्र

जि.प. व पं.स. साठी पाटण तालुक्यात सरासरी ६२ ते ६५ टक्के मतदान ; अनेक ठिकाणी मशीनमध्ये किरकोळ बिघाड ; तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान.

सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | संजय कांबळे

पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शनिवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत सरासरी ६२ ते ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. किरकोळ वाद व काही ठिकाणी मशीन बिघाडाचे अपवाद वगळता तालुक्यातील सर्व मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले.

सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंद होता. मात्र १० वाजल्यानंतर मतदारांचा उत्साह वाढू लागला. दुपारनंतर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

तारळे, ढेबेवाडी, चाफळ, मल्हारपेठ, मोरगिरी, केरळ, मारूल हवेली आदी भागांत मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. मुंबई-पुण्यासह बाहेरगावाहून आलेल्या मतदारांमुळे बहुतांश केंद्रांवर शेवटपर्यंत गर्दी दिसून आली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदानाचा अधिकार असल्याने काही ठिकाणी मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

दरम्यान, निवडणूक निरीक्षक सुषमा सातपुते यांनी पाटण येथे भेट देत मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंम्पे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत गुरव यांच्याकडून त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

आता सोमवार, दि. ९ रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून तोपर्यंत उमेदवार, कार्यकर्ते व मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सात ठिकाणी मशीनमध्ये बिघाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान पाटण तालुक्यातील सात मतदान केंद्रांवरील EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत गुरव यांनी दिली. कोंजवडे, वाझोली, कोकीसरे येथे कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्याने ते बदलण्यात आले. तर वजरोशी, तामिणे, दाढोली व उरुल येथे बॅलेट युनिटमध्ये बिघाड झाल्याने नवीन युनिट बसविण्यात आले. त्यानंतर सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

सोमवारी पाटण येथे मतमोजणी

सोमवार, दि. ९ रोजी पाटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथे मतमोजणी होणार आहे. EVM मशीनसाठी २३ टेबल, तर पोस्टल मतदानासाठी ७ टेबल अशी एकूण ३० टेबलांवर मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंम्पे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत गुरव यांनी दिली. मतमोजणीदरम्यान पाटण शहर व संवेदनशील ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही