
LiVE NEWS | UPDATE
लातूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
वलांडी (ता. देवणी) | देवणी तालुक्यातील वलांडी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस खालावत असल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकेकाळी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळख असलेली ही शाळा आता विद्यार्थीसंख्येत घट अनुभवत असून, भविष्यात शाळा ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांच्या मते, शाळेतील शैक्षणिक वातावरण बिघडण्यास मुख्याध्यापक तानाजी पाटील यांच्या कार्यपद्धतीला जबाबदार धरले जात आहे. पालकांनी केलेल्या आरोपानुसार, मुख्याध्यापकांची शाळेतील उपस्थिती नियमित नसून शाळेच्या वेळेत शिस्त व नियंत्रणाचा अभाव जाणवत आहे. प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थी विनाकारण फिरताना दिसतात, तर वर्गांमध्ये शैक्षणिक वातावरण अपेक्षित पातळीवर नसल्याची तक्रार आहे.
विशेष म्हणजे, दुसरे सत्र संपत आले असतानाही काही विद्यार्थ्यांना मूलभूत अक्षरओळख नसणे ही गंभीर बाब समोर आली आहे. यावरून अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी अधोरेखित होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. वार्षिक अभ्यासक्रमाचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
शाळेच्या एकूण कारभारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या गटशिक्षण अधिकारी संजय शिंदालकर यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, मुख्याध्यापक गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने शासकीय बदली नियमांचा पुनर्विचार करण्याची मागणीही पुढे येत आहे. यामुळे शाळेच्या प्रशासनात स्थिरता येण्याऐवजी ठप्पपणा निर्माण झाल्याचे मत व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करावी, तसेच शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.
यासंदर्भात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी शिक्षण विभागाकडे निवेदन सादर केले असून, वेळेत कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
